कोरोना : भुसावळात दोन दिवसात घेतले 523 नागरीकांचे स्वॅब

0

भुसावळ : शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मंगळवारी 235 नागरीकांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतल्यानंतर बुधवारीदेखील शहरातील सिंधी कॉलनीत 250 नागरीकांचे तर भुसावळातील नगरपालिका दवाखान्यात 38 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले. दोन दिवसात एकूण 523 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे दिड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहरात दररोज सातत्याने कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे तर भुसावळकरांची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागातर्फे मंगळवारी व बुधवारी दोन ठिकाणी रॅण्डमली स्वॅब घेण्यास सुरुवात करण्यात आली.

म्युन्सीपल हायस्कूलमध्ये घेतले 198 स्वॅब
शहरातील म्युन्सीपल स्कूलमध्ये पंचशील नगर, शनी मंदिर वॉर्ड आणि गंगाराम प्लॉट या भागातील 198 नागरीकांचे मंगळवारी स्वॅब घेण्यात आले तर सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालली. दरम्यान, रमजान महिन्यामुळे मुस्लीम बांधवांचे उपवास असल्याने या परीसरातील रहिवाशांचे सायंकाळी रोजा इप्तार झाल्यावर (उपवास सोडल्यावर) शहरातील खडका रोड भागातील पालिकेच्या दवाखान्यात सुद्धा मंगळवारी सायंकाळी सातनंतर रॅण्डमली स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत 37 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली. बाधीत रुग्ण आढळलेल्या परीसरातील नागरीकांचे यात स्वॅब घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दुसर्‍या दिवशी बुधवारी शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील 200 नागरीकांचे तर भुसावळ नगरपालिका दवाखान्यात 38 नागरीकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Copy