‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतातील उद्योगांना प्रोत्साहन

0

भुसावळ : कोविड-19 ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जगभरातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. दूरसंचार क्षेत्रातील परदेशी मल्टिनॅशनल कंपन्या आता भारताकडे नवीन पर्याय म्हणून बघत आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे नवीन जागतिक केंद्र बनण्याची क्षमता देखील आहे. चीननंतर सर्वाधिक मनुष्यबळ भारतात उपलब्ध आहे. शिवाय ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते आहे, असे प्रतिपादन डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी केले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागातर्फे जागतिक दूरसंचार दिवस 17 मे निमित्त आयोजित कोरोना सोबत भारतीय दूरसंचार क्षेत्रातील संधी या चर्चा सत्रात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे यांचे मार्गदर्शन लाभले.

जीवन व कार्यपद्धत्ती बदलण्याची महत्वाची भूमिका
येणार्‍या संपुर्ण शतकात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन जगाचा चेहरा-मोहरा, लोकांची जीवन व कार्य पद्धती बदलून टाकण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडणार आहे. कोरोना काळात माणसांना व जगाला इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानानेच जोडून ठेवले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मग त्या टिव्ही असेल मोबाईल असेल वा टेलिफोन. एकल संवादा बरोबरीनेच समुह संवाद सुद्धा टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे आविष्कार जसे झुम, ड्युओ यांच्या माध्यमातून शक्य करत वर्क फ्रॉम होम शक्य करून दाखविले आहे, असेही डॉ.गिरीश कुळकर्णी म्हणाले.

सध्याची स्थिती निराशाजनक पण कायमस्वरूपाची नाही : प्रा.भिडे
कोविड-19 कोरोना पॅनडेमिक नंतरही इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीचा उद्योग, शिक्षण, वैद्यकीय, वित्त व शेती इत्यादी विविध क्षेत्रात प्रचंड प्रभाव असणार आहे. या क्षेत्रातील पारंपरीक मार्ग बदलुन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशनच्या माध्यमातूनच ह्या क्षेत्रांतील वाटचाल सुकर होणार आहे. रोटी, कपडा व मकान या बरोबरीनेच टेलीकम्युनिकेशन व बँड विड्थ या जीवनावश्यक गरजा ठरणार आहेत. सध्याची स्थिती निराशाजनक असली तरी ही स्थिती कायम राहणारी नाही, उलट वर्षा दोन वर्षात सारे काही सुरळित झाले ही या क्षेत्राला उज्वल भवितव्य आहे. हे झाले देशांतर्गत बाजारपेठेचे, पण सध्याची जागतिक स्थिती बघता या क्षेत्रात चीन सह अन्य देशाला टक्कर देऊन स्पर्धा करण्याचीही आपल्याकडे क्षमता आहे असे मत प्रा.अनंत भिडे यांनी मांडले.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीची नवी योजना : प्रा.शिंदे
मोबाईल फोन, सेमी कंडक्टर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नव्या योजनेचा प्रस्ताव ठेवला आहे. या नव्या योजनेमुळे भारत जागतिक निर्मितीच्या शृंखलेचा एक भाग बनेल. या योजनेत योग्य बदल करून चिकित्सा क्षेत्रातील उपकरणांच्या निर्मितीवरही भर दिला जाईल. त्यामुळे गुंतवणूक वाढेल. त्यामुळे रोजगाराच्या अमर्याद संधी वाढतील. इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम अभियंत्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे असे प्रा.सुलभा शिंदे म्हणाल्या. दरम्यान, चर्चासत्रात डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.दीपक खडसे, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.नीता नेमाडे, प्रा.दीपक साकळे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.धीरज पाटील यांनी सहभाग घेतला होता.