कोरोना : भारतातील मृत्यूदर अमेरिका – चीनपेक्षाही जास्त

0

नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे अमेरिकेसह युरोपात मृत्यूतांडव सुरू आहे. त्या तुलनेत भारतातील आकडेवारी कमी असली तरी आकड्यांच्या विश्लेषणानंतर भारतामध्ये मृत्यूदराचे प्रमाण या देशांपेशा जास्त असल्याचे समोर आले आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या जगभरातील देशांच्या स्थितीच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिका, जर्मनी, चीनमध्ये सरासरी भारतामध्ये सध्या रुग्णांच्या संख्येइतकी संख्या असताना या देशातील मृत्यूचा आकडा खूप कमी होता. त्या तुलनेत भारतामध्ये जास्त मृत्यू झाले आहेत. अमेरिका, चीन आणि जर्मनीमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूचा सरासरी दर भारतापेक्षा खूप कमी आहे. डब्ल्यूएचओच्या रिपोर्ट्सनुसार भारतात आतापर्यंत एक लाख ७१ हजार जणांची करोना तपासणी झाली असून त्यापैकी ७,४४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत भारतात करोना व्हायरसमुळे २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा अमेरिकेत ७९८७ जणांना करोनाची लागण झाली होती तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. जर्मनी असा एकमेव देश आहे ज्यामध्ये ७१५६ जणांना करोनाची लागण झाल्यानंतर फक्त १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे करोनाचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये पहिल्या ७७३६ करोना रूग्णांपैकी १७० जणांचा मृत्यू झाला होता. यावरूनच असा अंदाज लावला जातोय की इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चिंताजनक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये ७४४७ करोना रूग्णांपैकी २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. याच आधारावर भाराताचा मृत्यूदर ३.२१ टक्के इतका आहे. दुसरीकडे अमेरिकेत ज्यावेळी ७०८७ जणांना करोनाची लागण झाली तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार अमेरिकेचा मृत्यूदर १.४१ टक्के असा होतो. जर्मनीचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. जर्मनीमध्ये ज्यावेळी ७१५६ करोनाचे रूग्ण झाले तेव्हा फक्त १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच आधारावर जर्मनीचा मृत्यूदर ०.१८ टक्के आहे. सात हजार रूग्ण झाले तेव्हा चीनचा मृत्यू २.२ होता.

Copy