कोरोना बाधित, संशयितांच्या मृत्युच्या परिक्षणासाठी समिती नियुक्त

1

जळगाव – जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना बाधित आणि संशयित व्यक्तींच्या मृत्यूचे परिक्षण करण्यासाठी समिती पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान जळगाव शहरातील गोल्ड सिटी हे ५० खाटांचे रूग्णालय कोव्हीडसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पारित केले आहे.
कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यात मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मृत्यूदरात राज्यात जळगावचा चौथा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन मृत्यूदराच्या परिक्षणासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज कोरोना बाधित, संशयित व्यक्तींच्या मृत्यूच्या परिक्षणासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले.

समितीत यांचा आहे समावेश
डेथ ऑडीट कमीटी म्हणजेच कोरोना बाधित, संशयित व्यक्तींच्या मृत्यूचे परिक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक पाटील, सदस्य डॉ. किरण मुठे, डॉ. धीरज चौधरी, डॉ. चंद्रय्या कांते यांचा समावेश असुन सदस्य सचिव म्हणून डॉ. विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

असे राहील समितीचे काम
ही समिती मयत व्यक्तींचे केस पेपरचे परिक्षण करून संबंधित मयत व्यक्तीवर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत माहिती घेऊन निष्कर्ष काढणे, मयत व्यक्तीस पुर्वी काही अन्य आजार होते काय? नियमीत औषधे सुरू होती काय? याची खात्री करणे, व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याचा अभ्यास करणे, उपचार सुरू असतांना कोणत्या स्तरावर उणिवा आढळुन आल्या याची सविस्तर माहिती घेणे व आवश्यक उपाययोजना सुचविणे असे या समितीचे कार्य राहणार आहे.

गोल्ड सिटीच्या ५० खाटा अधिग्रहीत
कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक बाब म्हणून जळगाव शहरातील गोल्ड सिटी रूग्णालयाच्या ५० खाटा प्रशासनाने कोव्हीडसाठी अधिग्रहीत केल्या आहे.

Copy