कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर तातडीने उपाय योजन्यासाठी जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर व चोपडा या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यवहार रविवार (10 मे) पासून लॉकडाऊन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज दिली. तसेच जिल्ह्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊनच्या काळात नागरीक, लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. ते जनता कर्फ्युचे पालन करु शकतात. असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्क्रिनींग वाढविण्यात आले आहे. याकरीता जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज जरी रुग्ण वाढत असले तरी भविष्यातील धोका यामुळे कमी होणार आहे. बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांचेवर आवश्यक ते उपचार झाल्याने त्यांचेपासून होणारा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील कंटन्मेंट क्षेत्रातील कोणाही व्यक्तींला त्या क्षेत्राबाहेर जाता अथवा येता येणार नाही. या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात तसेच या भागातील नियंत्रणासाठी स्थानिकांची मदत घ्यावी. कंटेन्मेंट क्षेत्रातील कोणीही व्यक्ती लॉकडाऊन संपेपर्यंत कुठल्याही सार्वजनिक आस्थापनेत कामावर येणार नाही याची खबरदारी संबधित आस्थापनांनी घ्यावी. या क्षेत्रातील ज्या नागरीकांना उच्च रक्तदाब, डायबेटिस व इतर आजार असतील व त्यांना तातडीने उपचार, औषधे घेणे, तपासणी करणे आवश्यक असेल तर अशा नागरीकांसाठी नियंत्रण अधिकारी सुचनेनुसार वाहन व्यवस्था करतील. तसेच कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठीही अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतील.
त्याचबरोबर जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील दवाखान्यांना आवश्यक बाबींसाठी आयुक्त सतीश कुलकर्णी तर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केद्रांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील हे नियंत्रक अधिकारी राहतील. या दवाखान्यांमध्ये रुगणांवर तातडीने उपचार होण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती करणे, या रुगणालयांमध्ये लागणारी औषधे व उपचार साधने पुरविणे, कोरोना योध्दांची नियुक्ती करण्याचे अधिकारी या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसेच प्रत्येक कोविड केअर सेंटरला आयुर्वेदिक डॉक्टारांची नेमणुक करण्याची सुचनाही जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. शैक्षणिक कारणासाठी जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे पुण्याचे जे विद्यार्थी अडकलेले असतील त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी फक्त विद्यार्थ्यांनीच प्रांताधिकारी दिपमाला चौरे मो. क्र. 9923567449 व उपजिल्हाधिकारी किरण सावंत मो. क्र. 7588591846 या मोबाईल क्रमांकावर आपले नाव, शिक्षणसंस्थेचे नाव व जाण्याचे ठिकाण याबाबतचा संदेश पाठवावा. (कॉल करु नये) त्यानुसार भुसावळ येथून लखनौला जाण्यासाठी ट्रेन रवाना करण्यात आली आहे. त्याचधर्तीवर बिहार व प. बंगालसाठी ट्रेनचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानात काऊंटरवर एकावेळी एकच व्यक्ती असावा. ज्या दुकानात या नियमांचे पालन होणार नाही त्यांच्या दुकानाचा परवाना लॉकडाऊन संपेपर्यंत निलंबित करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी यावेळी दिला.