कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार

0

शहादा । येथील कोरोना संसर्ग झालेल्या इसमाचा बुधवारी रात्री नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूची बातमी शहरात धडकताच खळबळ उडाली. शासनाच्या निर्देशित परिपत्रकानुसार मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी रात्री साडेदहा वाजता बाधित रुग्ण मयत झाल्याबद्दल माहिती येथील स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली. माहिती मिळाल्यानंतर एका रुग्णवाहिकेद्वारे मयत रुग्णाचे तीन नातेवाईक पीपी किट आणि अन्य आवश्यक उपाययोजनेसह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यविधीबाबत असलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तहसीलदार नंदुरबार, पोलीस निरीक्षक नंदुरबार आणि अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच अंत्यविधीसाठी येथून गेलेल्या नातेवाईकांना त्याच रुग्णवाहिकेने परत आणण्यात आले. तोपर्यंत प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, नंदुरबार येथील अधिकार्‍यांच्या संपर्कात होते.

शहाद्यात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर चिंतेचे वातावरण पसरले असतांना बाधित 31 वर्षीय इसमाचा बुधवारी मृत्यू झाल्याने शहादेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. बंदच्या दुसर्‍या दिवशी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले. सर्व व्यवहार बंद असल्याने संपूर्ण शहरात शुकशुकाट दिसून आला. प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारीचे उपाय म्हणून घरात राहण्यासंदर्भात वारंवार ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात येत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

Copy