कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समित्या कागदोपत्रीच

जबाबदारी निश्चितीसह नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

जळगाव, : फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समित्यांवर त्या गावातील जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु राजकीय गणिते टिकवून ठेवण्यासाठी निर्देशांकडे समिती पदाधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळेच कोरोना प्रादुर्भाव संक्रमण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सदस्यांवर जबाबदारी निश्चितीसह नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबर २०२० दरम्यान मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव संक्रमण होते. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य, पोलिस, स्वयंसेवी संस्थांसह सर्वच यंत्रणांच्या अथक परिश्रमाने डिसेंबरअखेरपर्यंत जवळ जवळ हद्दपार झाला होता. परंतु ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका, जिल्हा संवाद संपर्क अभियान, अनियंत्रित पक्ष मेळाव्यानंतर हद्दपार झालेला कोरोनाचा प्रसार पूर्वीपेक्षा जास्त वेगाने होत आहे. हे लक्षात घेता जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पोलिस यंत्रणांनी लक्ष देणे शक्य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत पालिका, तालुका तसेच ग्रामपंचायत ग्रामीण स्तरावर ‘कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समित्या’ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या समित्यांवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, सेविका आदींचा समावेश असल्याचे सांगितले होते.
परंतु ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी स्थानिक समित्यांचे पदाधिकारी सदस्य स्वत:ला प्रसिद्धी मिळवून घेण्यासाठी आणि आगामी काळात राजकीय गणिते टिकवून ठेवण्यासाठी शासन निर्देशांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या घटनांची माहिती वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येत नसल्याने व यासंदर्भात कोणीही जाब विचारण्यासाठी येत नसल्याने सर्वच ठिकाणी ‘ऑल ईज वेल’ दर्शविले जात आहे. परिणामी संसर्ग थांबत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या समित्या कार्यरत आहेत तेथे रुग्णांचे वाढते प्रमाण पहाता कोरोना जनजागृती ग्रामस्तरीय समित्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक- सेविका आदींवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन शासन निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.