कोरोनाविरूध्दच्या युध्दातील मयतांच्या वारसांना शासकीय सेवेत घ्या

0

जळगाव – सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थीतीतही कोरोना विरूध्द अनेक डॉक्टर, पोलीस, नर्स हे कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्रातही अशा योध्यांची संख्या मोठी असुन काही जणांचा कर्तव्य बजावतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या जिल्हा युवती प्रमुख कल्पीता पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हा युवती प्रमुख कल्पीता पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड-१९ या विषणूने जगभरात थैमान घातले असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशातच महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असताना जे आपले डॉक्टर, आरोग्य सेवक किंवा पोलीस बांधव यात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावतांना त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १ महिन्याच्या आत शासकीय सेवेत रूजू करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.