कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोदींचे सार्क देशांना आवाहन मात्र पाकचा हेखेखोरपणा कायम.!

0

प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

सध्या संपूर्ण जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने दहशत माजवलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून तर कोरोनाला महारोगराई असे घोषित करण्यात आले आहे. शिवाय, जगभरात आतापर्यंत यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हजारोंच्या घरात पोहोचला आहे. या विषाणूची बाधा झालेल्यांचा आकडा लाखात आहे. भारतातही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या महारोगराईपासून देशाची व जगाची सुटका करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी सार्क राष्ट्रांना कोरोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच यासाठी आकस्मिक निधी उभा करण्याचे सर्व राष्ट्रांना आवाहन करत भारताकडून यासाठी 1 कोटी डॉलरचा निधी देण्याचीही मोदींनी तयारी दर्शवली. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत कोविड-19 साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले, आपले लोकपातळीवरील संबंध प्राचीनकाळापासून आहेत. आपले समाज एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने तयारी करून कृती करावी व सामूहिक यश मिळावावे. आपल्याला कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तर एकत्र येवून त्याच्याशी लढण्याची गरज आहे. सार्क राष्ट्रांना सतर्क राहावे लागेल. सार्क राष्ट्रांमध्ये 150 पेक्षा कमी व्यक्ती आढळल्या आहेत. भारतात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती अभियान सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महारोगराई घोषित केले आहे. कोरोनापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. भारतात जानेवारीपासून स्क्रीनिंग केली जात आहे. कोरोनाचा धोका पाहता 1400 भारतीयांना जगभरातील विविध देशांमधून परत आणण्यात आले आहे. याचबरोबर शेजारील देशाच्या काही नागरिकांना देखील आम्ही मदत केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यावेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करत म्हटले आहे, की संकट काळात आपण एकत्र आलो आहोत. कोणतेच राष्ट्र या व्हायरसशी एकटेच लढू शकत नाही. यामध्ये सर्वांची मदत हवी आहे. मालदीव नशीबवान आहे, आम्हाला भारताची मदत मिळाली.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे म्हणाले, श्रीलंकेत हा व्हायरस पसरू नये, हेच आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. श्रीलंकेत परदेशातून परतणार्या नागरिकांना 14 दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवले जात आहे. आमच्या देशातील विद्यापीठ व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचे चर्चा आयोजानासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, वुहानमधील 23 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी धन्यवादही दिले.

दरम्यान,पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत करोना सारख्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष केले. पाकिस्तानात गेल्या 24 तासांमध्ये करोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 193 जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानात गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 130 हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, मंगळवारी सकाळी पहिल्या करोनग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेला व्यक्ती ईराणहून परतला होता. पाकिस्तानात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सिंध प्रांतात असून येथे जवळपास 155 जणांना करोनाची लागण झाल्याचे समजते. त्याखालोखाल खैबर पख्तूनख्वामध्ये 15, बलुचिस्तानमध्ये 10, गिलगिट बाल्तिस्तानमध्ये पाच , इस्लामाबादमध्ये दोन आणि पंजाबमध्ये एका व्यक्तिला करोनाची लागण झाली आहे.
करोना व्हायरसच्या फैलावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीसीएलचे उपांत्य फेरीचे दोन सामने व अंतिम सामनाही पुढे ढकलला. पाकिस्तानमध्ये गेल्या एका आठवड्यापासून करोना व्हायरसचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. पहिल्या आठवड्यात 33 रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं, पण सोमवारपासून पाकिस्तानमध्ये करोनाग्रस्तांची आकडेवारी वाढण्यास सुरूवात झाली. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 130 हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 193 जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, भारतात आतापर्यंत जवळपास 137 जणांना करोनाची लागण झाली असून सर्वाधिक 41 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
सार्क देशांच्या प्रमुखांच्या या परिषदेचा वापर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील र्निबधांकडे लक्ष वेधण्यासाठी केला. करोना फैलावाच्या पाश्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील निर्बंध त्वरित शिथिल करावेत, अशी सूचना पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा यांनी केली. परंतु मोदी यांनी जम्मू-काश्मीर करोनाशी लढण्यासाठी एकवटले आहे, असा स्पष्ट संदेश दिला. मिर्झा यांनी करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी चीनने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि चीनकडून सार्क देशांनी धडा घ्यावा, असे आवाहन केले.भारत पूर्ण ताकदीनिशी कोरोनाचा सामना करत असून भारतात पाकिस्तान पेक्षा या रुग्णांची संख्या कमी आहे. भारतामध्येही करोनाचे शंभरहून अधिक रुग्ण अढळून आले आहेत. मात्र भारताने करोनाला थांबवण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरुनच आता जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेन्क बेकेनडॅम यांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केलं आहे.जग भारताची प्रशंसा करत असताना पाकिस्तानने आपला हेकेखोरपणा इथं देखील कायम राखत कोरोनाचा वाढता व्हायरस रोखण्यासाठी चिनसह इतर देशांकडे मदतीची याचना करत आहे.

Copy