कोरोनावरील आयुर्वेदिक औषध चाचणीला पुढील आठवड्यात सुरुवात

3

पुणे : कोरोना विषाणूवरील आयुर्वेदिक औषधासाठी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी एकत्र आले आहेत. आयुर्वेदिक औषधाच्या देशभरातील चाचण्यांना पुढील आठवडयात सुरुवात केली जाणार असून, साधारणपणे चार महिन्यांत चाचण्यांचे निष्कर्ष हाती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना औषध प्रकल्पात सहभागी असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक डॉ. गिरीश टिल्लू यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. अरविंद चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली या चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनावर प्रतिबंधात्मक आणि उपचार असे दोन प्रकारचे औषध विकसित करण्याचा प्रयत्न आहे. उपचारासाठीच्या औषधामध्ये आयुष ६४, ज्येष्ठमध, पिंपळी आणि गुळवेल यांचा समावेश आहे, तर प्रतिबंधात्मक औषधासाठी अश्वगंधाचा वापर करण्यात येत आहे.

अ‍ॅलोपॅथीच्या औषधांसह आयुर्वेदिक औषधांचा काय परिणाम होतो हे चाचण्यांमध्ये पाहिले जाईल. तसेच रुग्णांचे संपूर्ण जीवनमान आणि औषधांचा दीर्घकाळ होणारा परिणाम विचारात घेतला जाईल. चाचण्यांचे निष्कर्ष हाती यायला साधारणपणे चार महिने लागतील. त्यानंतर कोरोनावरील औषध उपलब्ध होऊ शकेल. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी पहिल्यांदाच एकत्र येऊन औषधासाठी संशोधन करत असून, देशातील संशोधनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, असे डॉ. टिल्लू यांनी स्पष्ट केले.

पुण्यासह दिल्ली, मुंबई, नागपूर, अमरावती, वाराणसी आणि लखनौ या सात शहरांतील १५ रुग्णालयांमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहेत.

Copy