Private Advt

कोरोनामुळे आई वा वडिलांचा जरी मृत्यू झाल्यास मिळावी भरपाई

भाजपा वैद्यकीचे आघाडीचे डॉ.नि.तु.पाटील यांची मागणी

भुसावळ : कोरोना संसर्गामुळे पालकांपैकी आई वा वडिलांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी शासनाकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे निर्णय क्रमांक – अनाथ-2021/प्र.क्र.49/का-03 दि. जून 2021 नुसार एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा (आई आणि वडील) कोरोना (कॉविड-19) संसर्गामुळे मृत्यू झाल्यास अनाथ झालेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा हेतू हा की अनाथ झालेल्या बालकांची कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाल्याने त्यांना शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होई पर्यंत आयुष्य सन्मानाने जगता यावे म्हणून अश्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना अर्थसहाय्य देण्याचे ठरविले आहे. अशा बालकांच्या नावे एकरकमी पाच लाख रुपयांची रक्कम मुदतठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे.

एकाचा मृत्यू झाल्यानंतरही मिळावी भरपाई : डॉ.नितु पाटील
डॉ.पाटील यांच्या निवेदनानुसार, वडीलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बालकासह परीवार आर्थिकदृष्टया कमकुवत होतो वा आईचा मृत्यू झाल्यास बालक मायेची सावलीला पोरका होतो. शेवटी बालक एका दृष्टीने अनाथ होतोच. विशेष म्हणजे आई जर अशिक्षित असेल तर मग बालकांचे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन कोणाच्या भरवश्यावर होणार? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोना ही जागतिक महामारी घोषित करण्यात आली असल्याने या काळात एक जरी पालक करोना संसर्ग झाल्याने मयत झाले असले तरी महाराष्ट्र शासनाने सदर 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ बालकाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि तशी सुधारणा या निर्णयात करण्यात यावी, अशी अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते तसेच आरोग्यमंत्री व आरोग्य संचालक, मुंबई आरोग्य सेवा आयुक्तांलयाचे आयुक्त यांना पाठवण्यात आली आहे.