कोरोनामुक्त महिला म्हणाली… बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस् ; सगळासन् देव भल करो…

0

जळगाव – दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. चिंता, भितीत असणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात आढळून आलेली तिसरी कोरोनाबाधीत अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द महिला कोरोनामुक्त होवून बुधवारी घरी परतली आहे. कोरोना रुग्णालयात डॉक्टरांसह 36 जणांच्या स्टॉफच्या यशस्वी उपचारानंतर 17 व्या दिवशी महिला कोरोनामुक्त झाली आहे. डॉक्टरांसह कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी वृध्द महिलेने बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस सगळ्यांचे चांगले होईल या आपल्या शब्दात भावना व्यक्त केल्या.

टाळ्यांच्या गजरात स्वागत करत महिलेला निरोप
17 एप्रिल रोजी अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द कोरोना संशयित म्हणून कोरोना रुग्णालयात दाखल झाली होती. दुसर्‍या दिवशी 18 रोजी दिवसा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती महिला कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले होते. अवघ्या 15 दिवसातही वृध्द महिला कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान या महिलेला दोन दिवस कोरोना रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणेच्या निगराणीत ठेवण्यात आले. यानंतर ती प्रकृती चांगली असल्याने तिला बुधवारी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत डिचार्ज देण्यात आला. त्यांना एका रुग्णवाहिकेतून मुंगसे येथे त्यांच्या घरी पाठविण्यात आले.

या कोरोना योध्द्यांमुळे जिल्ह्यात दुसरा कोरोनोबाधीत बरा
चौदा दिवस धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील दुसरा व पहिलीच महिला रुग्ण बरी होऊन घरी परतली. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करण्यात या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे. या कालावधीत जिल्हा सामान्य रुगणालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांचेही सहकार्य लाभले.

सगळासन् देव भल करो…
उपचारानंतर बरे झाल्यावर घरी परततांना काय वाटतय असे या महिलेस विचारले असता ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप, भाऊ शेतस्’ ! सगळयांचे चांगले होईल असा माझा आशिर्वाद असल्याचे उद्गार काढले. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले असल्याचेही महिलेने सांगितले.

आणखी सात रुग्ण बरे होतील…
जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला याचे समाधान आहे. नागरीकांनी कोरोनाला घाबरु नये, पण काळजी घ्यावी. तसेच आमच्याकडे उपचार घेत असलेले रुग्ण लवकरच बरे होऊन त्यांना सुखरुप घरी पाठविण्यात आम्हाला यश येईल. आणखी सात रुग्ण बरे होतील, अशी आशा आहे. – डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय महाविद्यालय

Copy