कोरोनाच्या लढाईत राज्य सरकार पूर्णपणे निष्क्रिय – देवेंद्र फडणवीस

0

मुंबई – देशातील २० टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असून हे पूर्णपणे निष्क्रिय सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
भाजपाने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. करोना रुग्णांची संख्या रोज वेगाने वाढत आहे. यामधून राज्य सरकारची निष्क्रियता पहायला मिळत आहे. पण ग्राऊंट रिअ‍ॅलिटी वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात जनता, लोकांमध्ये अंसतोष निर्माण झाला आहे. करोना रुग्णांना उपचार मिळत नाही आहेत. आठ-आठ तास त्यांना रस्त्यांवर फिरावे लागते. रुग्णवाहिका मिळत नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी जागा नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. करोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण देशात चार टक्के असून महाराष्ट्रात १२.५ तर मुंबईत १३.५ टक्के आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात, मुंबईत करोनाचा प्रसार झाला आहे. सगळ्या महानगर, महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात करोना पसरला असून राज्य सरकारची त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी कोणतीही तयारी नाही. बीकेसी सेंटर तर दोन दिवसात भरुन जाईल अशी परिस्थिती आहे. पाऊस पडल्यावर काय करणार माहिती नाही. तो प्रश्नही उभा राहणार आहे. रुग्ण व्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही योग्य पाऊले उचलली जात नाही आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काही लोकांना आपला प्रवक्ता करुन आपण लढाई जिंकू असे सरकारला वाटत आहे असेही ते म्हणाले आहेत. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले. पण राज्य सरकारच्या वतीने एका दमडीचंही पॅकेज दिलेलं नाही. राज्य सरकार अंग चोरुन काम करत असल्याची परिस्थिती आहे. इतर राज्यांनी मदत जाहीर केली आहे, पण आपले सरकार एक नवा पैसा खर्च करण्यास तयार नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला अतिरिक्त निधी दिला असून रेशनही पुरवलेलं आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितले.

Copy