कोरोनाचे गांभीर्यच नाही… प्रशासनाची बैठक निव्वळ फार्स

0

महापालिकेतील बैठकीत कुठलाही ठोस निर्णय नाहीच ; सुचना मागविण्यातच धन्यता

जळगाव:शहरातील मार्केट, शॉपिंगमॉल, बिअर बार, हॉटेलमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत असून जळगांव शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल व्हिसीद्वारे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत जिल्हाधिकार्‍यांना सुचना केल्या. मात्र बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत कोरोना रोखण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना किंवा निर्णय घेण्यात आले नाही. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक निव्वळ फार्स ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरवासियांसी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आज महापालिकेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी ठोस निर्णय घेण्यापेक्षा व्यापार्‍यांकडुन सुचना मागविल्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजीत राउत म्हणाले कि जर जिल्हात पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा नसेल तर मात्र नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. याच बरोबर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी देखील गर्दी टाळण्याचे आवाहन केले. सदर बैठकीत उपयुक्त संतोष वाहुडे , उपयुक्त शंतोष गोस्वामी, उपयुक्त पवन पाटील उपस्थित होते. याच बरोबर शहरातील सर्व मार्केट असोसिएशन, बिअर बार, शॉपिंग मॉल, हॉटेल व्यवसाईक, सिनेमा थिएटर असोसिएशन यांचे पदाधिकारी, सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.

लग्न, उत्सवांवरच निर्बंध, राजकीय सभा, मेळाव्यांचे काय?
जळगाव शहरात मोठ्या उत्साहात मोठमोठी लग्न होत आहेत. 100 माणसांची अट असतानाही लग्नाला 500 -1000 नागरिक येत आहेत. यासाठी नागरिकांच्या संख्येवर अंकुश ठेवणे हि जबाबदारी लग्न कार्यालय मालकांची व तेथील नियोजकांची आहे. समजा या सर्वांना गर्दीवर अंकुश ठेवता येत नसेल तर मात्र कार्यालय मालकांनी आपले वेळा पत्र आम्हाला द्यावे, आम्ही आमची माणस तिथे ठेवतो आणि गर्दीवर अंकुश ठेवतो असे जिल्हाधिकारी अभिजीत्त राउत म्हणाले. जिल्हा प्रशासनाकडुन मात्र लग्न आणि उत्सवांवरच निर्बंध लादले जात आहे. जिल्ह्यासह शहरात होणार्‍या राजकीय सभा आणि मेळाव्यांना प्रशासनाकडुन अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

स्पेशल कॉल सेंटर उभ करणार
दुकाना बाहेर, हॉटेल, बार बाहेर जर गर्दी दिसली तर ती माहिती प्रशासनापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा प्रशासन एक स्पेशल कॉल सेंटर उभे करणार असुन इतर कोणीही गर्दी झाली तर फोनद्वारे तक्रार नोंदवू शकतील.

शाळा बंदची शक्यता
येत्या 7-8 दिवसात जर कोरोनाची संख्या अशीच वाढली तर मात्र लवकरच शाळा बंद कराव्या लागतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राउत म्हणाले. हॉटेल मध्ये, दुकाना बाहेर, गर्दी दिसून आली तर आम्ही अश्या ठिकाणांवर थेट धाडी टाकू असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई नाहीच
शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा विसर पडला की काय? अशीच परिस्थीती सध्या बाहेर दिसून येत आहे. कामानिमीत्ताने घराबाहेर पडणार्‍या बहुतांश नागरिकांच्या तोंडावर मास्क लावलेला दिसून येत नाही. असे असतांना प्रशासनाकडुन मास्क न लावणार्‍यांवर कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई होतांना दिसत नाही. अशीच परिस्थीती कायम राहिल्यास जिल्ह्यासह शहरात मोठी गंभीर परिस्थीती निर्माण होऊ शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Copy