कोरोनाचा नवा ‘अवतार’

0

डॉ.युवराज परेदशी: वर्षभर जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूचा नवा अवतार आता वर्ष संपत असताना ब्रिटनमध्ये आढळला आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराला ‘व्हीयूआय-202012/01’ असे प्रयोगशालेय नाव देण्यात आले आहे. नाव काहीही असो, परंतु कोरोनाच्या या नव्या अवताराने ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे. लवकरच तो युरोपात हातपाय पसरेल, अशी भीती आहे. यामुळे युरोपसह संपूर्ण जग धास्तावले आहे. कोरोनाच्या या नव्या अवतारामुळे चीननंतर आता ब्रिटनची जगाला धास्ती वाटू लागली आहे. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी कठोर परिश्रमानंतर जगातील देशांनी यावर लस विकसित केली असताना तसेच अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबियासह बर्‍याच देशांमध्ये लस देण्यासंबंधी मोहीम नुकतीच सुरू झाली असतान आता कोरोनाचे विकसित रूप समोर आल्याने जगभरात चिंता वाढणे स्वाभाविकच आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना या घातक विषाणूने वर्षभरापासून संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. जगातील 7.55 कोटी नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग झाला. त्यात आतापर्यंत 16.7 लाख लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. भारताचा विचार केल्यास. भारतात 1 कोटी 75 लाख 116 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून मृत रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजारावर पोहोचली आहे. यावरुन हा विषाणू किती घातक आहे याची जाणीव होते. कोरोनामुळे भारतासह संपूर्ण जगात लॉकडाऊन करावे लागले. या काळात अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. भारताची स्थिती पारशी वेगळी नाही. यामुळे कोरोनाविरुध्द लढा देण्यासाठी सर्व जग लसींकडे लक्ष देवून आहे. 2020 हे वर्ष संपत असताना अमेरिका, ब्रिटन सरकारने लसीकरणास परवानगी दिल्याने कोरोना लवकरच खात्मा होईल, अशी आशा वाटू लागली होती. मात्र हा आनंद अत्यल्पकाळ टिकला. कारण आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमाने रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, डेन्मार्क, फिनलँड, रोमानिया, क्रोएशिया आणि नेदरलँड यांच्याकडून इंग्लंडच्या विमानांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे लंडनसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे ख्रिसमस आणि इतर सण पहिल्यासारखे साजरे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ब्रिटनमध्ये कोरोना म्युटेड होऊन त्याच्यात बदल झाले आहेत. या विषाणूविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. सध्या कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे याबद्दल काही सांगता येत नाही, परंतु ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचे म्हणणे आहे की व्हायरस 70 टक्के अधिक संसर्गजन्य असू शकतो. म्हणजेच, त्यात अधिक सक्रिय क्षमता आहे आणि वेगाने पसरला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या नवीन प्रकाराच्या कोरोनाशी लढा देण्यासाठी लस किती प्रभावी असेल किंवा व्हायरस किती गंभीर आहे याबद्दल फारशी माहिती नाही. असे विषाणू मानवांमध्ये पसरल्यामुळे ते बदलतात आणि त्यांचे रूप बदलतात. फ्लू देखील व्हायरसचा एक प्रकार आहे. म्हणूनच दरवर्षी फ्लूसाठी नवीन लसीची आवश्यकता असते.

ब्रिटन आणि अमेरिकेच्या आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की या नवीन प्रकारचा कोरोना अधिक लोकांना संक्रमित करू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त धोकादायक असल्याचा पुरावा नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर चिंता व्यक्त केली करत युरोपिय देशांना सूचना देताना सांगितले आहे की, आधीच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मोठी खबरदारी घेण्याची आवश्यता आहे. हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आधीच्या विषाणूपेक्षाही घातक असल्यामुळे युरोपिय देशांनी पुन्हा लॉकडाऊन अथवा गर्दीवर कडक निर्बंध घालावे अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. 70 टक्के अधिक संसर्गाचे प्रमाण असल्याने याचा फैलाव कोरोनाहून कित्येक पटीने अधिक होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये याने पाय पसरायला सुरुवात केली. आता या विषाणूने मोठे रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणणानुसार कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक प्रमाणात याचा संसर्ग सुरु आहे. सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या कोरोना विषाणूचा 40 ते 70 टक्क्यांनी जलद प्रसार होऊ शकतो. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या कोरोना ’लस’चा प्रभाव कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे नव्याने संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूत उद्रेक वाढविण्याचे उपद्रवमूल्य आहे. या उद्रेकाला अटकाव करण्याचेच सद्यस्थितीतील लसींचे मुख्य उद्दिष्ट आहे.

लसीमुळे शरीरात रोगप्रतिकारकक्षमतेची वाढ होत असल्याने विषाणूतील एका बदलामुळे त्या परिणामकारक ठरणार नाहीत, असे म्हणणे अगदीच चुकीचे ठरेल. त्यामुळे लसी परिणामकारक ठरतील, अशी आशा संशोधक व्यक्त करत आहेत. कारोना संकटाचा सामना करणार्‍या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात गेल्या 24 तासांत करोनाचे 19 हजार 556 रुग्ण आढळले आहेत. सहा महिन्यात पहिल्यांदाच भारतात 20 हजाराहून कमी रुग्ण आढळले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 95.53 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.45 टक्के इतके आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सलग 15व्या दिवशी तीन लाखांहून कमी होती. हे प्रमाण एकूण संख्येच्या 3.02 टक्के इतके आहे. असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. कारण अशाच प्रकारच्या गाफिलपणाची मोठी किंमत भारताला चुकवावी लागली आहे. कोरोना संकटाचा दाहक अनुभव अनेकांनी घेतला आहे. यामुळे मोदी सरकारने गत काळात झालेल्या चुका टाळणे आवश्यक आहे. या नव्या संकटाला सामोरे जाण्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे, असा विचार न करता प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क व दोन फुटाचे अंतर हाच कोरोनाला रोखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

Copy