कोरोनाग्रस्त मयताच्या पत्नीला प्रशासनाने सोडले वाऱ्यावर

0

शिरपूर:तालुक्यातील भाटपुरा येथील एकाचा २२ मे रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर आरोग्य विभागाने जवळच्या व्यक्तींचे कोरोना तपासणी नमुने घेतले होते.परंतु पॉझिटिव्ह मयत व्यक्तीच्या पत्नीला कोणत्याही सुरक्षा साधनाशिवाय धुळे येथे पती बरोबर दवाखान्यात पाठविण्यात आले होते. दरम्यान, पतीचा मृत्यू झाला. पण आरोग्य प्रशासनाने पत्नीला वाऱ्यावर सोडत पत्नी ४३-४४ अंश सेल्सिअस तापमानात ७० किलोमीटर पायपीट करीत भाटपुरा या आपल्या गावी पोहचली आहे. आरोग्य विभागाच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य व्यक्ती कोरोना विषयी तपासणीसाठी पुढे येत नाही, असा दबक्या आवाजातून नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

सविस्तर असे, भाटपुरा येथील मयत व्यक्ती आधी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला होता. त्याचे स्वॅप घेण्यात आले होते. त्याला दवाखान्यांमध्ये भरती न करता घरी सोडून देण्यात आले होते. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाला आपली चूक लक्षात आली आणि तातडीने त्याला ॲम्बुलन्स पाठवून धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. तेथे ही प्रशासनाने फार मोठी चूक केली ती म्हणजे पतीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असताना त्याच्या सोबत त्याच्या पत्नीला कोणताही मास्क किंवा कोणतेही सुरक्षा किट तसेच कोणतीही खबरदारी न घेता तसेच गाडीत बसवून धुळे जिल्हा रुग्णालय पाठवले गेले.

पत्नी ७० किलोमीटर अंतर कापत पायी

भाटपुरा येथील “त्या” कोरोनाग्रस्तांचा २५ मे रोजी मृत्यू झाला. त्याचे १९ नातेवाईकांचे स्वब घेण्यात आले होते. त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना सोडण्यात आले. पण त्या कोरोनाग्रस्तांची पत्नी तेथेच बसून होती. तिची कोणतीही चाचणी घेण्यात आली नाही. ती कोरोनाग्रस्त मयताची पत्नी २६ मे रोजी सकाळी नऊ वाजता धुळे येथून ४३-४४ डिग्री सेल्सिअस तापमानात पायपीट करत शिरपूर सूतगिरणीजवळ ७० किलोमीटर अंतर कापत पायी आली.तिच्याजवळ फक्त एक फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी देण्यात आलेली होती. शोध घेणाऱ्या नातेवाईकांना ती कोरोनाग्रस्तांची पत्नी मिळाली. त्या महिलेबाबत माहिती मिळताच गावातील सरपंच शैलेंद्र चौधरी, सदस्य रोशन सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, थाळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे कर्मचारी गावात दाखल झाले आहे.