Private Advt

कोरपावलीतील शिक्षकाचे हृदयविकाराने निधन

उपचारार्थ हलवताना रस्त्यातच मालवली प्राणज्योत

यावल : तालुक्यातील कोरपावली येथील 56 वर्षीय शिक्षकास शाळेतच ह्रदय विकाराचा झटका आला व उपचारार्थ हलवत असताना शिक्षकाची प्राणज्योत मालवली. ही दुर्दैवी घटना गुरूवारी दुपारी घडली. मुस्तफा नामदार तडवी (56, नायगाव, ता.यावल) असे मयत शिक्षकाचे आहे.

शाळेतच हृदयविकाराचा झटका
मुस्तफा नामदार तडवी (56) हे जिल्हा परीषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा कोरपावली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. गुरूवारी ते सकाळी शाळेत आले व शालेय कामकाज करीत असतांना त्यांना दुपारी 12 वाजेला अचानक छातीत दुखू लागले. ही बाब त्यांनी मुख्याध्यापक धनराज कोळी यांना सांगितल्यानंतर तातडीने तडवी यांच्या नायगाव येथील कुटुंबियांना माहिती कळवण्यात आली.तडवी यांचे भाऊ व नातेवाईक लागलीच कोरपावली येथे आले व त्यांनी मुस्तफा तडवी यांना नायगाव येथे घरी आणले व तेथून ते भुसावळ येथे खाजगी रूग्णालयात तडवी यांना उपचारार्थ घेवून जात असतानाच
रस्त्यातच त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तडवी यांना मृत घोषीत केले.

लोकप्रतिनिधींनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली माजी सरपंच जलील पटेल, मुक्तार पटेल, मुख्याध्यापक धनराज कोळी, शिक्षण विभागाचे विजयसिंग पाटील, ग्रामसेवक मजीत तडवी, नायगावचे निसार तडवी, नजीर तडवी, न्याजोद्यीन तडवी, रज्जाक तडवी, सिराज तडवी, अनिल जंजाळे, सह आदींनी धाव घेतली व तडवी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
या प्रकरणी सुपडु नामदार तडवी (नायगाव) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. मयत तडवी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परीवार आहे. शिक्षकाच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.