कोथळी तीर्थक्षेत्राला सुधारित प्रशासकीय मान्यता अशक्य

0

नागपूर (निलेश झालटे ) – जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणार्‍या आणि संत मुक्ताईचे जन्मस्थान असलेल्या मुक्ताई मंदिर कोथळी ता.मुक्ताईनगर या ब वर्गाच्या तीर्थक्षेत्रासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देणे शक्य नसल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. विधानसभेत माजी मंत्री तथा मुक्ताईनगरचे आ. एकनाथराव खडसे यांनी कोथळी तीर्थक्षेत्राच्या विकासकामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत प्रश्न उपास्थित केला होता. कोथळी तीर्थक्षेत्राच्या विकासकामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविला आहे. या प्रस्तावावर अद्याप निर्णय न झाल्याने तीर्थक्षेत्राच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लोकप्रतिनिधींच्या मार्फत 4 ऑगस्ट रोजी दिले गेलेले आहे.

162 लाखाच्या निधीचीच मान्यता
याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्र्यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, मुक्ताईनगर मंदिर कोथळी या ब वर्गाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध कामांसाठी 7.04 कोटी इतका निधी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी शासनास दिला होता. मात्र सदर प्रस्तावातील काही कामे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या निकषानुसार नसल्याने फक्त भक्तनिवास व संरक्षण भिंत या कामाकरिता 162 लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, त्यापैकी 86 लाख रुपये जिल्हा परिषदेला वर्ग केल्याची माहितीही ग्रामविकास मंत्र्यांनी दिली. तसेच तीर्थक्षेत्राजवळील इतर विकासकामे सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहेत. तसेच भक्तनिवास व संरक्षण भिंत या कामांचा निधी बांधकाम मंडळाला दिला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्र्यांनी दिली.

नाथाभाऊंवर आता सगळी कमान
मुक्ताईनगर हे जिल्हाच नव्हे तर राज्यातील भाविकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. संत मुक्ताबाईच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा इतिहास अनोखा आहे. एवढ्या महत्वाच्या विषयाकडे एकनाथराव खडसे मंत्री असताना देखील प्रयत्न झाले नाहीत. स्वताच्या गावातील एवढे महत्वाचे तीर्थक्षेत्र असताना विकास साधू न शकणार्‍या एकनाथराव खडसे यांनीच हा प्रश्न विधानसभेत प्रकर्षाने ठेवला होता. अर्थात यावर प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नसली तरी आपल्याच पक्षाच्या नेत्यांकडून सुधारित मान्यतेला लाल दिवा मिळाल्याने भाविक व मुक्ताईप्रेमींचा मात्र काहीअंशी हिरामोड होणार आहे. अर्थातच नाथाभाऊ प्रश्न लावून धरण्यात आणि आपली समस्या सोडवून घेण्यात तरबेज असल्याने या प्रकरणात देखील ते न्याय मिळवून देतील अशी आशा आहे.

जिल्हाधिकार्‍यांना कळविले असल्याची माहिती
सदर कामांना ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुधारित प्रशासकीय मान्यता देणे शक्य नसल्याने, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासाबाबतचा नियोजन विभागाच्या 4 जून 2015 च्या शासन निर्णया अन्वये प्रस्ताव तयार केला होता. सदर प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या अध्याक्षेतखाली जिल्हास्तरीय समिती व जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीच्या मान्यतेने शासनास सादर करण्याबाबत जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांना कळविण्यात आल्याचेही ग्रामविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर उच्चाधिकार समिती व शिखर समितीच्या मान्यतेने पुढील कारवाई केली जाणार असल्याचे ग्रामविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.