Private Advt

कोथळीत घरफोडी : चार लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात

मुक्ताईनगर : तालुक्यातील कोथळी येथे 5 लाखांची घरफोडी झाली होती. या गुन्ह्यातील अन्य तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गत 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान कोथळी येथील विजय शिंदे यांच्याकडे सुमारे पाच लाखांची घरफोडी झाली होती. या प्रकरणी जळगाव पोलिसांनी मोहनसिंग बावरी आणि सतबीरसिंग टाक या दोन अट्टल चोरट्यांना अटक करून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

अन्य तिघे आरोपीही जाळ्यात
यानंतर मुक्ताईनगरचे डीवायएसपी विवेक लावंड, एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी संयुक्तपणे तपास केला. त्यात घरफोडी प्रकरणात मुक्ताईनगर कनेक्शन असल्याचे समोर आले. यानंतर अटकेतील दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता मेहुण (ता.मुक्ताईनगर) येथील दीपक उर्फ सोनू राजू पाटील याचे नाव पुढे आले. तसेच मोनूसिंग बलवंतसिंग बावरी आणि अनिल रमेश चौधरी या जळगाव येथील दोघांचा सहभाग समोर आला. तिघांना अटक केल्यावर त्यांनीचार लाखांचा मुद्देमाल काढून दिला. या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे.