कोडगे, निर्लज्ज यापेक्षाही वाईट बोला; पण शेतक-यांना कर्जमाफी द्या

0

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संघर्ष यात्रेबद्दल बोलताना विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज असे शब्द वापरले. आम्हाला या ही पेक्षा वाईट बोला, पण संकटात असलेल्या राज्यातील शेतक-याला कर्जमाफी द्या असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. पिंपरी चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या भाजपा कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला चढवला होता.

आज शेतकऱ्यांच्या अवस्थेला काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत. असं कोणतेही खात नाही तिथे यांचे हात बरबटलेले नाही. तरीसुद्धा कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांसमोर जातंय. संघर्ष यात्रा काढणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते निर्लज्ज आणि कोडगे आहेत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना खा. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात विरोधकांचा सन्मान राखण्याची प्रगल्भ लोकशाही परंपरा आहे. गेल्या ५७ वर्षाच्या राज्याच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने विरोधकांकरिता अशा भाषेचा वापर केलेला नाही. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असे शब्द वापरून आनंद मिळत असेल तर त्यांच्याकडून या ही पेक्षा वाईट शब्द ऐकण्याची आमची तयारी आहे. राज्यातील शेतक-यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गेल्या अडीच वर्षात साडे नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. एकाही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. राज्यात तूर उत्पादक शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून घर-दार आणि लेकर-बाळं उघड्यावर सोडून खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. तूर भरून आणलेल्या ट्रॅक्टर आणि टेम्पोचे भाड़े हे तूर विकल्यावर त्याला मिळणा-या रकमेइतक होऊ लागले आहे. राज्यात शेतक-यांची इतकी वाईट परिस्थिती असल्याने आपल्या पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतक-यांनाही कर्जमाफी द्यावी. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच महाराष्ट्राची आर्थिक क्षमताही उत्तर प्रदेशपेक्षा मोठी आहे. आपणच राज्यातील तूर उत्पादकांना शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु राहतील असा शब्द दिला होता. पण २२ एप्रिल पर्यंतच नोंद झालेल्या शेतक-यांची तूर खरेदी करण्याचे आदेश दिले त्यामुळे तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणा-या शेतक-यांची फसगत झाल्याचे वाटत आहे. असेही खासदार चव्हाण म्हणाले.