कॉंग्रेसकडेही पैसा होताच

0

मुंबई महापालिकेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेकडून आपल्या नाकर्तेपणाचे जे खुलासे सुरू आहेत, ते अतिशय केविलवाणे आहेत. त्यातला एक आरोप म्हणजे प्रचंड पैसा ओतून वा सत्तेचा वापर करून भाजपा यशस्वी झालेला आहे. त्यात कितीसे तथ्य आहे? असली भाषा करणार्यांना शिवसेना मागली पंचवीस तीस वर्षे माहापालिकेत कशी जिंकली, तेच ठाऊक नसल्याची ही साक्ष आहे. 1985 सालात शिवसेनेने महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होत सत्ता काबीज केली. तेव्हाही शिवसेनेच्या खिशात पैसे नव्हते, की राज्याची सत्ता शिवसेनाप्रमुखांच्या रिमोट कंट्रोलने चालत नव्हती. तेव्हा केंद्र वा राज्याच्या सत्तेत भाजपा नव्हता, तर कॉग्रेस होती.

त्या सत्तेच्या ताकदीवर कॉग्रेसला मुंबई महापालिका कशाला जिंकता आली नाही? मुरली देवरा किंवा कृपाशंकर सिंग अशा मुंबई कॉग्रेसच्या नेत्यांकडे पैशाची कमतरता होती, असा कोणी दावा करणार आहे काय? त्यांनीही पैशाचा महापूर मुंबईत आणलेला होता. पैशाच्या वा सत्तेच्या बळावर मुंबई महापालिकेत शिवसेनेला पराभूत करणे शक्य असते, तर मुळात 1985 सालात सेना सत्तेतच आली नसती. तेव्हा तर आजच्यापेक्षाही सेनेची स्थिती केविलवाणी होती. बालेकिल्ला मानल्या जाणार्या गिरणगावातच लोकसभा विधानसभेत दत्ता सामंत यांच्या संघटनेने मोठे यश मिळवले होते आणि शिवसेना संपल्याची चर्चा सुरू झालेली होती. देशात राजीव लाट होती आणि त्यावर स्वार होऊन मुरली देवरासारख्या मुरब्बी राजकारण्याने पैशाच्या थैल्या खुल्या केलेल्या होत्या. तेव्हा वेगळे व्यक्तीगत पोस्टर छापण्याचेही पैसे सेनेच्या उमेदवारापाशी नव्हते. इतक्या विपरीत स्थितीत शिवसेनेने मुंबई पालिकेत सर्वात मोठा पक्ष होऊन एकहाती सत्ता मिळवली होती. मग तीच शिवसेना आज पैसा व सत्तेच्या बळावर भाजपाने यश मिळवल्याचे कसे बोलू शकते? आपलाच इतिहास सेना विसरली काय?

आज उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंना जरा विश्वासात घेऊन पक्षप्रमुखांनी 1985 सालातल्या त्या एकमेव सार्वत्रिक पोस्टरची माहिती घ्यावी. मुंबईभरच्या तमाम उमेदवारांसाठी एकच पोस्टर छापलेले होते आणि तेवढ्या प्रचार साहित्यावर पैसा व सत्तेचा पराभव करून दाखवला होता. ‘मराठी माणसा जागा हो!’ असे शिर्षक असलेले ते दुरंगी पोस्टरच देवरांच्या पैशाला व कॉग्रेसच्या सत्तेला पुरेसे ठरलेले होते. त्याची किमया सांगणारा देसाई नावाचा नेता अजूनही पक्षप्रमुखांच्या गोतावळ्यात हयात आहे. जरा त्याच्याशी सल्लामसलत करायला हरकत नाही. कारण ते पोस्टर काढण्यापासून वितरीत करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी सुभाष देसाईंनीच पार पाडलेली होती. असा माणुस आजही हाताशी असताना, पैशाचा व सत्तेचा बागुलबुवा करण्यात अर्थ नाही. त्यावेळी अपुर्या साधनांनिशी लढणारी शिवसेना आज कुठे आहे, असाच खरा सवाल आहे. कारण तेव्हाच्या शिवसेनेच्या पाठीशी पैसा वा सत्तेचे बळ नव्हतेच. आमदारांचेही बळ नव्हते. काही महिने आधी झाले्ल्या निवडणूकीत सामंतांसह राजीव लाटेवर मात करून जिंकणारा एकमेव आमदार छगन भुजबळ तितका सेनेच्या फ़ौजेत उपलब्ध होता. तरीही शिवसेनेने देवरांचा पैसा, सामंतांची लोकप्रियता आणि आपल्या गरीबीवर मात करून दाखवली होती. कारण तेव्हा शिवसेनेत गर्जना करणारे नेते नव्हते, की बोलघेवडेपणा करणार्यांचा सुकाळ झालेला नव्हता. मोजके नेते आणि लढणारे बख्खळ शिवसैनिक, अशी या संघटनेची सुस्थिती होती. आज सेनेत चाणक्य व रणनितीकारांचा सुकाळ झाला आहे आणि गल्लीबोळात शिवसैनिक मात्र दिसेनासे झाले आहेत. त्यामुळेच त्यांना आपल्या पराभवाची कारणे इतर पक्षांप्रमाणे शोधावी लागत आहेत. दहा मंत्री आपल्या फ़ौजेत असतानाही भाजपाने सत्ता व पैसा वापरल्याचा पोकळ आरोप करावा लागतो आहे.

हीच आजकालच्या शिवसेनेची खरी समस्या झालेली आहे. कसल्याही पैसे व साधनांशिवाय शिवसेना जिंकत होती, तेव्हा तिला जिंकणारे उमेदवार शोधावे लागत नव्हते. तेव्हा शिवसेनेत तिकीटवाटप होत नव्हते, की उमेदवारीचे अर्ज मागवावे लागत नव्हते. आजचा नगरसेवक आपोआप पुढल्या विधानसभेचा उमेदवार व्हायचा आणि जिथे नुसती शाखा होती, तिथे राबणारा शाखाप्रमुख आपोआप पुढल्या महापालिकेचा वॉर्डातील उमेदवार असायचा. तो जिंकणार की हरणार, याची कोणाला फ़िकीर नसायची. त्याचे आपल्या क्षेत्रातील काम व वावर यालाच प्राधान्य होते. त्याला तिकीट मिळवण्यासाठी सेनाभवनात वा मातोश्रीवर घिरट्या घालाव्या लागत नव्हत्या. त्यामुळेच कुठल्या पक्षाची सत्ता आहे, किंवा कुठल्या पक्षाकडे पैसा आहे, त्याची शिवसेनेला पर्वा नव्हती. आपापल्या भागातील जोडलेली मतदार जनता हेच शिवसेनेचे बळ असायचे. आज तशी वा ती शिवसेना कितपत शिल्लक उरली आहे? 1985 सालात लागोपाठच्या लोकसभा विधानसभा निवडणूकात दणका बसल्यावर बाळासाहेबांनी सर्वच्या सर्व शाखाप्रमुखांना सरसकट पालिकेसाठी उमेदवार अशी घोषणा केली. तेव्हा त्यांचे निकटवर्ति असलेले नेतेही हैराण होऊन गेले होते. खुद्द प्रमोद नवलकरांनीच ही गोष्ट मला सांगितलेली आहे. नेत्यांनाही बाळासाहेबांचा तो निर्णय धाडसी नव्हे, तर अतिरेकी वाटलेला होता. कारण इतकी साधने नव्हती. राजकीय वातावरण पुर्ण विपरीत होते. पण अशा प्रतिकुल स्थितीला जाऊन भिडण्याची हिंमत बाळगणारा नेता शिवसेनेचे निर्णय घेत होता. मतदाराने त्यालाच दाद दिली आणि मतदारानेच सत्ता आणि पैशाचा पराभव करून दाखवला होता. ते धाडस बाळासाहेबांनी कशाच्या बळावर केलेले होते? त्यांनी नेत्यांवर विश्वास ठेवला होता, की आणखी कुठल्या बाबा-बुवांचा आशीर्वाद घेऊन असा धाडसी निर्णय घेतला होता?

बाळासाहेबांचा मराठी अस्मितेवर विश्वास होता आणि आपल्या शाखाप्रमुखांसह शिवसैनिकाच्या झुंजार वृत्तीवर विश्वास होता. त्याच बळावर बाजी मारू शकतो, अशा आत्मविश्वासावर त्यांनी सत्ता व पैशाचा माज उतरवून दाखवला होता. त्यांच्यापुढे कॉग्रेसची सत्ता टिकली नाही, की मुंबई कॉग्रेसच्या पैशाच्या थैल्या मुजोरी दाखवू शकल्या नाहीत. मग त्यांच्यामागे आज त्यांचीच शिवसेना असल्या गोष्टींचा बागुलबुवा करताना दिसते, तेव्हा काय कमी पडते आहे, त्याची ओळख होऊ शकते. आज बाळासाहेब यांच्या धाडसाला शिवसेना वंचित झाली आहे. त्यांनी दाखवलेल्या जनतेवरील विश्वासात सेना कमी पडते आहे. अखेरच्या दसरा मेळाव्यातले त्यांचे शब्द तरी कोणाला आठवतात? ‘आजवर मी तुम्हाला संभाळून घेतले, तुम्ही मला संभाळून घेतलेत. यानंतर उद्धव आणि आदित्यला संभाळून घ्या!’ त्याच मतदाराने मुंबईकराने मागल्या विधानसभेत साहेबांची अपेक्षा पुर्ण केली होती. युती मोडूनही भाजपाला तुल्यबळ आमदार शिवसेनेला दिले होते. पण त्यानंतर पक्षप्रमुखाने मुंबईकराला व मराठी माणसाला संभाळून घेत, पुढली वाटचाल करायला हवी होती. ती कितपत केली आहे? कुठल्याही स्वार्थ वा मतलबाला लाथ मारून सामान्य माणसाच्या हितासाठी व अस्मितेसाठी उभा रहाणारा नेता, अशी प्रतिमा साहेबांची होती. त्यात सगळा चमत्कार दडलेला आहे. परिणामांची पर्वा केल्याशिवाय निर्णय घेणारा नेता म्हणूनच त्यांच्या समोर लोक लोटांगण घालायचे. त्यासाठीच लोक मातोश्रीची पायरी चढायचे. कारण त्या माणसाला पैसा वा सत्तेने कोणी घाबरवू शकला नाही, की अशा साधनांचे भय कधी वाटले नाही. आजच्या शिवसेनेला तो आपला संस्थापक तरी आठवतो की नाही याचीच शंका येते. त्याच धाडसाअभावी मुंबईत सेनेला आज महापौर निवडून आणण्यासाठी धावपळ करायची नामुष्की आणलेली आहे.