कॉंग्रेस आमदाराचा राजीनामा: या राज्यातील सरकार अल्पमतात

0

पद्दुचेरी: देशातील २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशापैकी केवळ ५ राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात कॉंग्रेसची सत्ता आहे. मित्रापाक्षांसोबत कॉंग्रेस सत्तेवर आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस सरकार कोसळले, त्यानंतर राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकार पडण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान आता पुन्हा कॉंग्रेसच्या एका राज्यातील सरकार अल्पमतात आले आहे. पुदुच्चेरी राज्यातील आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यामुळे आता काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. ए जॉन कुमार यांनी विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. सिवकोलुंथू यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. विरोधी पक्ष भाजपकडून बहुमत चाचणीची मागणी केली गेली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या पुदुच्चेरी दौऱ्याच्या आधीच अशा प्रकारे काँग्रेससमोर राजकीय पेच निर्माण झाल्यामुळे आता राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीचे सरकार आहे. आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले आहे. ए. नामासिवायम आणि मल्लाडी कृष्ण राव हे दोन मंत्री आणि ई थीप्पैथन या आमदाराने राजीनामा दिला आहे. त्याशिवाय, एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कारवायांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३३ आमदारांच्या पुदुच्चेरी विधानसभेमध्ये आता काँग्रेस-द्रमुक आघाडीचे १४ तर भाजप-अद्रमुक आघाडीचे देखील १४ आमदार राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या १४ आमदारांमध्ये १० काँग्रेस, ३ द्रमुक आणि १ अपक्ष आमदाराचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजप-अद्रमुक आघाडीमध्ये ३ भाजप, ७ एनआर काँग्रेस आणि ४ अद्रमुकचे आमदार आहेत.