केळीवर करपा : शेतकर्‍याने साडेसहा हजार खोडे उपटली

करपा निर्मूलन योजना सुरू करण्याची अपेक्षा : रावेर तालुक्यातील तीन हजार एकरावर केळीवर करप्याचे संकट

खिर्डी (सादिक पिंजारी) : सुमारे चार लाख रुपये खर्च करून लावलेल्या केळीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने साडेसहा हजार केळी रोपे अल्पभूधारक शेतकर्‍याने नाईलाजाने उपटून फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे बुधवारी घडली. अनधिकृतरीत्या निकृष्ट दर्जाची टिश्यू कल्चर रोपे विकणार्‍याविरुद्ध कृषी विभागाने धडक कारवाई करावी, अशी अपेक्षा केळी उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.

करपा रोगामुळे उत्पादक पुन्हा संकटात
सध्याच्या ढगाळ हवामानामुळे आणि मधून-मधून पडणार्‍या पावसामुळे तालुक्यातील केळीवर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा विळखा पडला आहे. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी केळी उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करावी लागत असून त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील ज्ञानदेव इंगळे या अल्पभूधारक केळी उत्पादक शेतकर्‍यावर तर यावर्षी आभाळच कोसळले आहे. त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीची फक्त दोन एकर शेती आहे. त्यांच्या वाटेवर त्यातील फक्त दोन बिघे जमीन येते. इंगळे कुटुंब त्यांच्या हेमंत या एका मुलासह अन्य शेतकर्‍यांची शेतजमीन नफ्याने करून आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवतात. यावर्षी त्यांनी सावदा येथील एका खाजगी नर्सरीतून केळीची साडेसहा हजार टिश्यू कल्चर रोपे प्रत्येकी आठ रुपय प्रमाणे विकत घेतली. लागवडीनंतर काही दिवसांनी रोपांवर करपा रोगाचा प्रभाव दिसायला लागल्यावर त्यांनी विक्रेत्याला त्याबाबत सांगितले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. नंतर या विक्रेत्याचे अपघाती निधन झाल्याचे ज्ञानदेव इंगळे यांचा मुलगा हेमंत याने सांगितले.

अखेर केळी खोड उपटून फेकण्याची आली वेळ
या वर्षीचे सततचे ढगाळ हवामान आणि रोपांमध्ये असलेला दोष यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची पाने वाळली होती. प्रत्येक झाडावर केवळ दोन-तीन पाने हिरवी शिल्लक होती. लागवड करूनही साडे सहा महिने झाले तरीही केळीला केळ फुल आले नव्हते, केळीची उंची ही वाढत नव्हती. अखेर बुधवारी शेतकरी ज्ञानदेव इंगळे, त्यांच्या पत्नी, मुलगा हेमंत इंगळे आणि कुटुंबातील सदस्यांनी लाखो रुपये खर्च करून लावलेली आणि वाढवलेली केळी जड अंतःकरणाने कापून काढली. या केळीसाठी त्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये नफा दुसर्‍या शेतकर्‍याला आधीच दिला असून 52 हजार रुपयांची रोपे खरेदी केली होती. त्यांच्या स्वतःच्या शेतातून पाईप-लाईन आणल्याचा आणि वीज बिलाचा खर्चही मोठा होता तसेच करपा पडल्यानंतर तीन-चार वेळेस औषध फवारणी केली होती. असे सगळे मिळून सुमारे 4 लाख रुपये खर्च झाले आहेत आणि हाती मात्र काहीही आले नाही. यामुळे इंगळे कुटुंब हताश झाले आहे.

करपा निर्मूलन योजना बंद
तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने सुमारे 90 कोटी रुपये अनुदानाची केळी करपा निर्मूलन योजना सुमारे 12 वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यात या योजनेत केळी उत्पादक शेतकर्‍यांना निम्म्या दरात करपा निर्मुलनाची औषधे कृषी विभागाकडून मिळत असत. त्या काळात मोठ्या प्रमाणात करप्याचे निर्मूलन जिल्ह्यासह महाराष्ट्रात झाले होते मात्र गेल्या सात-आठ वर्षापासून या योजनेतील निम्मे अनुदान शिल्लक असूनही योजना बंद झाली आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केळी उत्पादक शेतकर्‍यांनी अनेक वेळा मागणी करूनही ही योजना कृषी विभागाने पुन्हा सुरू केलेली नाही. खासदार खडसे यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी केळी उत्पादक शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

रावेर तालुक्यात करप्याचे प्रमाण मोठे
याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता एकट्या रावेर तालुक्यात तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर करपा रोगाचा प्रसार झाल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात थंडी आणि ढगाळ हवामान यामुळे करपा वाढणार असून केळी उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत येणार आहेत. करपा निर्मुलनाची औषधे केळीवर फवारण्यासाठी हेक्टरी सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. केंद्रीय कृषी विभागाने तातडीने या प्रकरणी अनुदान पुन्हा देणे सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.