केंद्र सरकारचा एचएएलमधील हिस्सा विक्रीला; आजपासून सुरुवात

0

नवी दिल्ली: केंद्र सरकार एचएएल अर्थात हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडमधील आपला हिस्सा विकणार आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के हिस्सा विकणार आहे अशी माहिती आहे. आज गुरुवारी २७ ऑगस्टपासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ओएफएससाठी फ्लोअर प्राईस १००१ रुपये प्रति शेयर इतकी ठेवण्यात आली आहे.

जून २००७ मध्ये एचएएलला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला. उत्पादन मूल्याच्या दृष्टीने एचएएल संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. एचएएल अनेक प्रकारची उत्पादने तयार करते. याशिवाय उत्पादनाची डिझाईन्स, देखभाल, दुरुस्तीची कामंदेखील एचएएलकडून केली जातात. एचएएलने आतापर्यंत अनेक हेलिकॉप्टर्स, विमानं आणि त्यांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती केली आहे.

एचएएल संशोधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. याशिवाय लायसन्स ऍग्रीमेंटदेखील केले आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी एचएएलची १३ कमर्शियल जॉईंट व्हेंचर्स आहेत.

ओएफएसद्वारे विक्री
ओएफएसला ऑफर फॉर सेल म्हणतात. शेयर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांचे प्रवर्तक आपली भागिदारी कमी करण्यासाठी ओएफएसचा वापर करतात. सेबीच्या नियमांनुसार ओएफएस जारी करू इच्छिणाऱ्या कंपनीला दोन दिवसांपूर्वी याबद्दलची सूचना सेबीसोबतच एनएसई आणि बीएसईला द्यावी लागते. यानंतर गुंतवणूकदार एनएसई आणि बीएसईला माहिती देऊन या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. गुंतवणूकदार कोणत्या किमतीला शेयर खरेदी करू इच्छितात, त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. गुंतवणूकदार आपापल्या बोली लावतात. त्यानंतर बोलींच्या एकूण प्रस्तावांची गणना केली जाते. त्यातून इश्यू किती सबस्क्राईब झाला, याची माहिती मिळते. यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अलॉटमेंटला सुरुवात होते.

Copy