केंद्र-आंध्र प्रदेश सरकारमधील वादामुळे आयएनएस विराटचे अस्तित्व धोक्यात

0

नवी दिल्ली । पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आयएनएस विक्रांत या युद्धनौका शेवटी भंगारात काढण्यात आली होती. तशीच वेळ आता भारतीय नौसेनेसाठी तीन दशकं मोलाची कामगिरी करणार्‍या आयएनएस विराट या युद्धनौकेवरही येणार की काय, अशी शंका येऊ लागली आहे. या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी करायच्या खर्चावरून केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यातील वादामुळे 27,800 टन एवढ्या वजनाची ही युद्धनौकाही भंगारात मोडीत काढली जाऊ शकते. 58 वर्षे जुनी असलेल्या आयएनएस विराट युद्धनौकेची 6 मार्च ही निवृत्तीची तारीख ठरवण्यात आली आहे. सुरुवातीला 27 वर्षे या युद्धनौकेने रॉयल ब्रिटिश आर्मीसाठी सेवा दिली. त्यानंतर 1987 साली ही युद्धनौका भारतीय नौसेनेत दाखल करण्यात आली. 13 मजली उंच असलेल्या या युद्धनौकेवर संग्रहालय तयार करण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आंध्र प्रदेश सरकारला ही युद्धनौका पाहिजे आहे, पण त्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याकडून अर्ध्या खर्चाची मागणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने मात्र संग्रहालय बनवण्यासाठी सल्ला आणि तांत्रिक मदत करण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनिश्‍चिततेच्या भोवर्‍यात सापडलेल्या या युद्धनौकेला मुंबईत 6 मार्च रोजी निवृत्त करण्यात येणार आहे.

आयएनएस विराटने 2250 दिवसांचा प्रवास केला आहे. या युद्धनौकेने केलेला एकूण प्रवास पाहता तिने 27 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे बोलले जाते. 1989 मध्ये श्रीलंकेतील भारतीय शांतीसेनेच्या मोहिमेत विराटने उल्लेखनीय कामगिरी केली होती. याशिवाय 1999 मधील कारगिल विजय मोहिमेतही या युद्धनौकेने आपले अस्तित्व दाखवून दिले होते. 750 फूट लांब असलेल्या या युद्धनौकेवर सी हॅरिअर लढाऊ विमाने, सी-किंग, कामोव्ह, एएलएच आणि चेतक हेलीकॉप्टर तैनात करण्यात आली होती. या युद्धनौकेवर सुमारे 1600 नौसैनिक, अधिकारी कार्यरत होते. जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून आयएनएस विराटची गिनीज बुकात नोंद करण्यात आली होती.

नौसेनेला संग्रहालय करायचे आहे

सुमारे 5 लाख नॉटिकल माईल ( तब्बल 9 लाख 30 हजार किलोमीटर) इतका प्रवास करणार्‍या आयएनएस विराटचे संग्रहालयात रूपांतर व्हावे, अशी नौसेनेचे इच्छा आहे. भारताची पहिली विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतप्रमाणे विराटही भंगारात मोडीत निघू नये, असे नौसेनेच्या अधिकार्‍यांना वाटते. संरक्षण विभागाच्या विविध संस्थांमध्ये आयएनएस विराटच्या डेकवरून उड्डाण घेणार्‍या 11 सी हॅरिअर लढाऊ विमानांना स्मारक म्हणून ठेवण्याचे नौसेनेचे प्रयत्न आहेत. 11 सी हॅरिअर लढाऊ विमाने छोट्या धावपट्टीवरून किंवा पृष्ठभागाला समांतर राहून उड्डाण करू शकतात. आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे लोखंड दुचाकीचे उत्पादक असलेल्या बजाज कंपनीने घेतले होते. या लोखंडातून त्यांनी बजाज वी 15 ही बाईक बनवली होती.

इंग्लंडमध्ये झाली होती बांधणी

इंग्लंडमधील विकर्स शिप बिल्डर्स अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने 1944 ते 1953 दरम्यान या युद्धनौकेची बांधणी केली होती. 1959 मध्ये एचएमएस हर्मिस या नावाने ही युद्धनौका ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाली. हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रिंस चार्ल्सने 1975 मध्ये एचएमएस हर्मिसवर प्रशिक्षण घेतले होते. 1982 मध्ये फॉकलंड युद्धात महत्त्वाची भूमिका बजावल्यावर 1985 मध्ये या युद्धनौकेला रॉयल नेव्हीतून सेवामुक्त करण्यात आले होते. 12 मे 1987 पासून आयएनएस विराट या नावाने ही युद्धनौका भारतीय नौसेनेत समाविष्ट करण्यात आली. 1997 मध्ये आयएनएस विक्रांत निवृत्त झाल्यावर भारतीय नौसेनेतील ही एकमेव युद्धनौका होती. 2014 मध्ये रशियातून आणलेली आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू नौका दाखल करून घेण्यात आली.