कॅशलेस पध्दतीने केला विवाह सोहळ्याचा खर्च

0

भुसावळ : विवाह सोहळा म्हटले की, बॅण्डबाजा, जेवणावळी असा धुमधडाका आलाच मात्र सद्यस्थितीत चलनबदलानंतर उद्भवलेल्या स्थितीमुळे लग्न समारंभासाठी पैशांची जुळवाजुळव करणे अडचणीचे ठरत आहे. सरकार देखील कॅशलेस प्रणाली वापरण्याचे आवाहन करीत आहे. पंतप्रधानांच्या हाकेला साद देऊन येथील डॉ. भोलाणे यांनी आपल्या लहान मुलाच्या विवाहासाठी अतिरीक्त खर्च टाळून आपल्या रुग्णालयातील कर्मचार्‍यांना निमंत्रण देऊन केवळ 51 लोकांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे यासाठी जो काही खर्च लागला तो सर्व खर्च त्यांनी कॅशलेस पध्दतीने केला.

51 लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याशेजारील डॉ. नरेंद्र भोलाणे यांचा लहान मुलगा प्रशांत भोलाणे व केतकी हिरे यांचा विवाह 17 रोजी संपन्न झाला. प्रशांत हा अमेरिकेत 12 वर्षांपासून अभियंता म्हणून कामाला असून 12 डिसेंबर रोजी त्यांची पुण्यात भेट झाली व 17 ला विवाह करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर यावेळी त्यांनी ना बॅण्ड, ना मंडप, ना वर्‍हाडी यावर खर्च न करता केवळ आपल्या रुग्णालयातील कर्मचारी, मोजके जवळचे नातेवाईक मिळून 51 लोकांना घरगुती जेवण सर्व धार्मिक विधी घरात पार पाडले. यासाठी त्यांनी केवळ 25 लग्न पत्रीका छापून वाटल्या. यासाठी दागिणे, कपडे, पत्रिका व भोजनासह इतर खर्च त्यांनी कॅशलेस पध्दतीने केले. प्रशांत भोलाणे हे मुलगा अमेरिकेत अभियंता असून नववधूने चेन्नई येथे एमबीएची पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे केवळ दोन दिवसात त्यांचे लग्न जुळून 17 रोजी विवाह सोहळा पार पडला.