Private Advt

कॅब बुकिंगच्या नावाखाली अमळनेरच्या इसमाची 49 हजारात फसवणूक

भुसावळ/अमळनेर : कॅब बुकिंगच्या नावाखाली एकाला 49 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अनोळखीने घातला गंडा
धनराज शंकर पाटील (50, रा.पवन चौक, देशमुख गल्ली, अमळनेर) यांना मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून एका वेबसाईटवर चौकशी केली असता त्यांना एका अनोळखी नंबरवरून माहिती पुरवण्यात आली. त्याने एका अनोळखी नंबरवरून फोन आला की, ‘तुमची बुकींग होऊन जाईल’ त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअपवर एक लिंक आली. त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन 100 रुपये टाकून बुकिंग करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यानुसार धनराज पाटील यांनी दोन वेळा लिंकवर क्लिक करून ओपन करण्याचा प्रयत्न केला पैश्यांचा व्यवहार झाला नाही. त्यानंतर त्यांनी एक वेळेस प्रयत्न केला असता त्यांच्या अकाउंटमधून 100 रुपये कमी झाले. सायंकाळी ‘ट्रॅव्हल गुरु’ नावाची एपीके फाईल व्हाट्सअपवर पाठवले आणि अ‍ॅप डाऊनलोड करून सर्व ऑप्शन चालू करा, असे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी सर्व ऑप्शन सुरू केले. काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून 49 हजार रुपये ऑनलाईन कमी झाल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल अहिरे करीत आहे.