कृषी विधेयकाविरोधातील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ट्रॅक्टर पेटवले

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयकांना मंजुरी दिली. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचे आरोप करण्यात येत असून पंजाबसह संपूर्ण देशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आज सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिले. राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. अग्निशमन दलाच्या दोन गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. त्यानंतर आग विझविण्यात आली.

आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.

कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने शनिवारी रात्री उशिरा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता. “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे” अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.