कृषी केंद्रांवर कापसाच्या बियाण्यांची जादा भावाने विक्री

0

शिंदखेडा:तालुक्यात विविध कृषी केंद्रांवर कापसाच्या बियाण्यांची जादा भावाने विक्री केली जात आहे. खरीप हंगामात ऐन कापूस लागवडीच्या काळात शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवून जादा भावाने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश पाटील यांनी केली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अद्यापही काही शेतकऱ्यांंचा कापूस घरात पडून आहे. तो केव्हा विकला जाईल या चिंतेत शेतकरी आहे. काही शेतक-यांनी शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने एकतर फेकून दिला किंवा शेतातच पुरून टाकला.रब्बी हंगाम कोरोनामुळे वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या दमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतकरी कापसाच्या राशी बियाणाला पसंती देतो. तालुक्यातील शहरासह दोंडाईच्यातील कृषी सेवा केंद्रांवर राशी कंपनीचे बियाणे विक्री होत आहे.काही कृषी सेवा केंद्रांवर मात्र, शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे. राशी बियाण्याच्या एका पाकिटाची किंमत ७३० रुपये असून दुकानदार १००० ते ११०० रुपयात विक्री करत आहेत. येथे शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे.

शासनाने निश्चित ठरवून दिलेल्या किंमतीलाच बियाणे मिळावे

परिसरातील शेतकऱ्यांची खरीप पूर्व हंगामाच्या कापूस पिकाची लागवडीसाठी तयारी सुरू असून उन्हातान्हात शेती करणाऱ्या बळीराजाला संबंधित कंपनी व शासनाने निश्चित ठरवून दिलेल्या किंमतीलाच बियाणे मिळावे, यासाठी संबंधित कृषी विभागाने कृषी केंद्रांना आदेश द्यावेत, अशी मागणी दुर्गेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Copy