कृषी उद्योगाला १ लाख कोटींचे पॅकेज

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी 20 लाख कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी आज, कृषी उद्योगाला 1 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी पॅकेज देण्यात येत आहे. शेती, सिंचन, पशुपालन, मच्छीमारी यासाठी पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

2 कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देणार, खाद्यपदार्थांच्या लघू उद्योगांना मदत, लघू उद्योगांना 10 हजार कोटींची मदत, डेअरी कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट, मत्स्य उद्योगासाठी 20 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मच्छिमार आणि नाविकांचा विमा काढला जाणार आहे.

हर्बल आणि औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. 10 लाख हेक्टरमध्ये हर्बल शेती केली जाणार असून, औषधी वनस्पती लागवडीसाठी 4 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मधमाशी पालनासाठी 500 कोटींची योजना असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

पाळीव प्राण्याच्या लसीकरणासाठी मदत केली जाणार असून 53 कोटी जनावरांना लस दिली जाणार आहे. यासाठी 13 हजार 300 कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

लघु आणि मध्यम शेतकऱ्यांकडे 85 टक्के शेती आहे. देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक कामे केली आहेत.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 महिन्यांत शेतकऱ्यांना 18700 कोटी रुपये देण्यात आले. पीक विमा योजनेंतर्गत 6400 कोटींचे वितरण करण्यात आले.