कृषीवर आधारित गावचा विकास

0

शेतकर्‍यांचा शेतमाल स्वस्त असावा हा पाश्‍चिमात्य अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हाच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि थढज चा सिद्धांत निर्माण झाला आहे. दुर्दैवाने पंडित नेहरूंपासून ते मोदी सरकारपर्यंत याच सिद्धांताचे पालन केले. इंदिरा गांधी सोडल्या तर शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात सरकारे अग्रेसर राहिली. मोठ्या उद्योगपतींचा सर्वात विश्‍वासू राज्यकर्ता म्हणजे शरद पवार. 50 वर्षे राज्य करून त्यांनी शेतकर्‍यांची दैन्यवस्था आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. पण बुडत्याला आधार देण्याचे काम त्यांनी केले नाही. मोदींची मर्जी सांभाळून पद्मभूषण पटकावले. आता राष्ट्रपती होण्याकडे गाडी वळवली आहे. शेतमालावर व्यापार्‍यांचा पूर्ण कब्जा होता व आजदेखील आहे. शेतकरी सरकारपेक्षा आडत्यांवर अवलंबून राहिला. अन्नधान्यात भारत स्वयंपूर्ण झाला. एवढेच नव्हे तर उत्पादन क्षमता प्रचंड वाढली. पण शेतकरी दारिद्य्रात बुडत चालला. याचे एकमेव कारण म्हणजे राज्यकर्ते व्यापाराचे हस्तक झाले. शेतकरी पोरके झाले. म्हणूनच शेतकर्‍यांना आपला लढा आपणच लढावा लागणार. आपल्या मागण्यासाठी शेतकर्‍यांची संघशक्ती निर्माण करून शेतकर्‍यांना उद्योगपती/आडत्यांबरोबर युद्ध करावे लागणार आहे. आपला हक्क आपल्याला कोण भीक म्हणून देणार नाही, तर संघर्षाच्या अंती मिळणार आहे. हा एक मार्ग झाला.

पण दुसरीकडे शेतकर्‍यांनीदेखील आपली परिस्थिती नीट ओळखून संघटितपणे आपले उत्पन्न वाढवण्यासाठी एक निर्णायक दिशा घेतली पाहिजे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकत्र शेतीची आणि एकत्र विक्रीची व्यवस्था निर्माण करावी लागणार. 90% शेतकरी अल्पभूधारक आहेत. ती नुकसानीचीच ठरणार. म्हणून कमीत कमी 100 एकरचे प्लॉट बनवावे लागणार. 25 ते 100 शेतकर्‍यांना एकत्र यावे लागणार. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असो किंवा सहकारी शेती असो, जमीन कृषी वसाहती स्वरूपात एकत्र आणावी लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान या संस्थेतर्फे समृद्ध व स्वयंपूर्ण गाव ही योजना सुरू केली आहे. शेतकर्‍यांना वरदान ठरणारी ही योजना आहे. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली.

समृद्ध व स्वयंपूर्ण गाव योजनेमध्ये लोकसहभागातून गावचा विकास करून त्याद्वारे उत्पन्न व उत्पादकता वाढवण्याकरता आणि शाश्‍वत पद्धतीने उपजीविकेच्या सुरक्षेसाठी सेंद्रिय/झीरो बजेट शेती पद्धतीवर भर देण्यात आला आहे. कृषीची समस्या मोठी आहे. प्रत्येक जमिनीच्या विखुरलेल्या तुकड्यामुळे शेती व्यवसाय अशक्य आहे. त्यातच जमीन मालक शहरात गेले. शेती करायला कोणीही नाही. ही परिस्थिती बदलायला पाहिजे. म्हणूनच समृद्ध व स्वयंपूर्ण गावाची संकल्पना अस्तित्वात आणली आहे. शेतीमध्ये सिंचन हा अतिमहत्त्वाचा घटक आहे. सिंचनासाठी पंचक्रोशी केंद्र धरून छोटी धरणे, केटी बंधारे, जलविद्युत प्रकल्प आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, असे कार्यक्रम उभे राहिले पाहिजेत. पूर्ण जमीन पाण्याखाली आणणे याला सर्वात जास्त प्राथमिकता दिली पाहिजे.

महाराष्ट्रातील शेतकरी राजास आधुनिक आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक पिकांच्या उत्पादन निर्मितीला वाव आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे सोपवलेली शेतजमीन विखुरलेली आहे. जमिनीचे मालक शहरांमध्ये जास्त आहेत. अलीकडे शेतजमीन विकण्याचा सपाटा चालू आहे. त्यासाठी कृषी औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची गरज आहे. ज्या शेतकर्‍यांना शेती करणे शक्य होत नाही त्यांच्या जमिनीवर त्यांच्याच सहभागाने जमिनी नांगराखाली आणण्यास हा उपक्रम राबवण्यात येत आहेत.

कृषी औद्योगिक वसाहती निर्माण करून यांत्रिकीकरणाची संयुक्त सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून औजारे, उपकरणे व इतर साहित्य शेतकर्‍यांंना पुरवण्यात येऊन त्यांची एकत्रित सेवा देण्यात येणार आहे. कृषी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांना सामूहिक शेतीसाठी प्रोत्साहन देणे व त्याबद्दल त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणे, शेतीची उत्पादकता आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे, कृषीवर आधारित रोजगार निर्माण करणे, कृषिमाल प्रकियेसाठी सोयीसुविधा निर्माण करणे, कृषी उत्पादनाचा खर्च कमी करणे, कृषिमाल विक्री व्यवस्था निर्माण करणे आणि हे सर्व करीत असताना पर्यावरणाचे संवर्धन करणे अशा बाबींचा समावेश आहे.

कृषी औद्योगिक वसाहत विकास या संकल्पनेमध्ये करणे शेतकर्‍यांच्या गरजेनुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुरूप विविध कृषी पद्धती राबवण्यात याव्यात. विविध शेती पद्धती कृषी+फळबाग+भाजीपाला, कृषी+कुक्कुुटपालन, कृषी+वनशेती, कृषी+जोडधंदे, शेती+विक्री व्यवस्था रचना अशा पद्धतीने कृषीवर आधारित गावचा विकास करता येईल.
एकंदरीत इंटरनेटच्या वापरापासून कृषी वसाहतीसारखे एकत्र शेतीचे प्रयोग शेतकर्‍यांना तारक ठरू शकतात. त्याचबरोबर शेतीमाल विक्री व्यवस्था थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम म्हणजे समृद्ध किसान चळवळ. सर्व शेतकर्‍यांनी समृद्ध शेती चळवळीत सामील व्हावे.

कृषी औद्योगिक वसाहत विकास या संकल्पनेमध्ये करणे शेतकर्‍यांच्या गरजेनुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुरूप विविध कृषी पद्धती राबवण्यात याव्यात. विविध शेती पद्धती कृषी+फळबाग+भाजीपाला, कृषी+कुक्कुटपालन, कृषी+वनशेती, कृषी+जोडधंदे, शेती+विक्री व्यवस्था रचना अशा पद्धतीने कृषीवर आधारित गावचा विकास करता येईल. एकंदरीत इंटरनेटच्या वापरापासून कृषी वसाहतीसारखे एकत्र शेतीचे प्रयोग शेतकर्‍यांना तारक ठरू शकतात. त्याचबरोबर शेतीमाल विक्री व्यवस्था थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम म्हणजे समृद्ध किसान चळवळ.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत – 9987714929