कुलरच्या हवेत दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात

0

जळगाव – शहरात उन्हाचा पारा 45 अंशावर जावून पोहचला आहे. यामुळे उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून कुलर हवेत दरवाजा उघडे ठेवून झोपणे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मीनगरातील सपकाळे कुटुंबियांना चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरातील एलईडी, मोबाईल व पैशांचे पाकिट असा 20 हजार 970 रुपयांचा ऐजव लांबविल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, लक्ष्मीनगरात गणेश बळीराम सपकाळे (वय-38) हे श्रीराम कन्याशाळेजवळ वास्तव्यास आहेत. रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करून कुलर लावून ते कुटुंबियांसह झोपले. यादरम्यान त्यांनी दरवाजा उघडा ठेवला. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात चार्जिंगला लावलेला 8 हजाराचा मोबाईल, 12 हजार रूपयांचा एलईडी टीव्ही आणि पाकीटात ठेवलेले 970 रूपये असा ऐवज लांबविला. घरातील उठल्यावर घरातील मोबाईल, टीव्ही तसेच पैशांचे पाकिट नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन मुंडे करीत आहेत.

Copy