कुलभूषण जाधव यांना पाककडून फाशीची शिक्षा

0

नवी दिल्ली : भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार रावळपिंडी येथील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाकिस्तानी प्रसार माध्यमांनीही याबाबत वृत्त दिले आहे. गेल्यावर्षी 3 मार्च 2016 मध्ये बलुचिस्तान प्रांतात त्यांना अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीचे असून मुंबईत वास्तव्यास आहे. जाधव हे माजी नौदल अधिकारी आहेत.

तो व्हीडीओ संशयास्पद
मध्यंतरी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एका व्हीडीओदेखील प्रसिद्ध केला होता. या व्हीडीओत जाधव यांनी आपण भारतीय गुप्तहेर संस्था रॉ साठी काम करत असल्याची कबुली दिली होती. बलुचिस्तान व कराचीत अशांतता निर्माण करण्यासाठी रॉने तैनात केल्याचे त्यांनी व्हीडीओत म्हटले होते. मात्र, या व्हीडीओत अनेक फेरफार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातील कलम 59 आणि गोपनीयतेच्या कायद्यातील कलम 3 नुसार जाधव यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, भारतानेही हा व्हीडीओ संशयास्पद असल्याचे म्हटले होते. भारताने कुलभूषण जाधव यांना राजदूतावासाशी संपर्क साधू देण्याची विनंती पाकिस्तानकडे केली होती. मात्र, भारताचे हेर असलेले कुलभूषण यांनी विशिष्ट कारणासाठी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना राजदूतावासाशी संपर्क साधण्याची संधी देता येणार नसल्याचे सांगत पाकने भारताची विनंती धुडकावली होती.

ठोस पुरावे नाहीत
कुलभूषण जाधव यांनी नौदलातून मुदतीपुर्वीच निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. दरम्यान, त्यांना गेल्यावर्षी मार्चमध्ये गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली पाकने अटक केली होती. जाधव यांना आमिष दाखवून बलुचिस्तानात नेण्यात आले होते. ते भारताचे नागरिक आहेत, पण ते गुप्तहेर नाहीत असे केंद्र सरकारचे म्हणणे होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी तशी कबुलीही दिली होती. कुलभूषण जाधव प्रकरणातील कागदपत्रांवरुन त्यांच्याविरोधात ठोस पुरावा आढळलेला नाही असे अझीझ यांनी म्हटले होते.

परिवारानेही आरोप फेटाळले
कुलभूषण जाधव हे त्यांच्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा भारत सरकारकडून यापुर्वीच करण्यात आला होता. कुलभूषण जाधव यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे जाधव परिवाराने पाकने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतात असे जाधव यांच्या कुटूंबाकडून सांगण्यात आले.