कुलगुरू पदासाठी डॉ. गाडे पात्र नाहीत

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी त्यांच्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण केली नसल्याचा आरोप माजी सिनेट सदस्य डॉ. अतुल बागुल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. यावेळी सजग नागरीक मंचाचे विवेक वेलणकर उपस्थित होते.

डॉ. बागुल म्हणाले, कुलगुरू डॉ. गाडे यांनी विद्यापीठाचे कुलाधिपती यांना खोटी माहिती सादर करून कुलगुरू पद प्राप्त केले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना त्यांच्या बायोडाटा मागितला असता त्यांनी तो देण्याचे टाळले होते. माहिती अधिकाराचा वापर करून त्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली असता कुलगुरूंचा बायोडाटा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले होते. यानंतर त्यांच्याबाबत माहिती गोळा केली असता त्यांनी सादर केलेली माहितीही फसवी असल्याचे लक्षात आलेे. त्यांनी त्यांच्या अर्जात अनेक खोट्या गोष्टी सादर केल्याचे उघड झाले आहे. ज्या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कधी काम केले नाही. त्या विभागाचे प्रमुख असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. 1996 ते 2003 या काळात दिल्ली विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये सात वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत असल्याचे अर्जात त्यांनी नमूद केले आहे. मात्र ते तिथे सहयोगी प्राध्यापक नाही तर व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत होते. याच काळात दिल्ली येथे आयजीआयबी-सीएसआयआर संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरीस असताना विभागप्रमुख पदावर काम करत होते. यावरून एकावेळी दोन पदांवर एकच व्यक्ती काम कसा करू शकेल? असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यांनी आपल्या नावावर एकूण तीन पेटंट असल्याचा दावा केला आहे. मात्र यांपैकी प्रत्यक्ष दोन पेटंट त्यांच्या नावार असून एका पेटंटसाठी त्यांनी अ‍ॅप्लिकेशन पाठवले आहे. अद्याप ते मंजूर झालेले नाही. पीएच.डीसाठी एकूण नऊ विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र नऊपैकी पाच विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आणि प्रत्यक्षात फक्त दोनच विद्यार्थ्यांचे ते सहाय्यक मार्गदर्शक असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातील विधी विभागाचे विभाग प्रा.पी.एस.एन.शास्त्री यांनी सुरू केलेला ह्युमन राईट ड्युटीज एज्युकेशन डॉ.गाडे यांनी स्वतः सुरू केला असल्याचा दावा केला आहे. ही सर्व माहिती खोटी असल्याचे उघड झाले असल्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि शासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी.

वेलणकर म्हणाले, कुलगुरूंबाबत अशी धक्कादायक माहिती हाती लागणे ही खूपच गंभीर बाब आहे. या माहितीची लवकरात लवकर दखल घेऊन डॉ. गाडे यांची चौकशी व्हावी व ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी.

बायोडाटातील माहिती खरीच
विद्यापीठ प्रशासनाला सादर केलेली माहिती व माझा बायोडाटा यामधील संपूर्ण माहिती खरी आहे. याबाबतचे सर्व रेकॉर्ड माझ्याकडे आहे. विद्यापीठासाठी इतकी वर्षे प्रामाणिकपणे राबूनही माझ्यावर असे आरोप होणे हे खूपच दुर्दैवी आहे.
– डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ