कुलगुरुंची बदनामी; 1 कोटी रुपयांची नोटीस

0

जळगाव: भुसावळ येथील पी.के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यावरही विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेऊन लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप करणार्‍या एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना कुलगुरुंची बदनामी केली म्हणून 1 कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अशी नोटीस विद्यापीठाच्यावतीने पाठविण्यात आली आहे.

एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी लाखो रुपये घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यावरही डॉ. मंगला साबद्रा यांना प्राचार्य पदावरची नियुक्ती तशीच ठेवली आहे. अशा आशयाचे पत्रक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यामध्ये या प्रकरणात कुलगुरुंशी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोपही केला होता. समाज माध्यमांमध्येही तशी क्लिप त्यांनी प्रसारित केली होती. या बातमीमुळे विद्यापीठाची बदनामी केली म्हणून विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या स्वाक्षरीने देवेंद्र मराठे यांना अ‍ॅड. सुशील अत्रे व अ‍ॅड. निशांत अत्रे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.

माफी मागा, अन्यथा कारवाई
विद्यापीठाची बदनामी केली म्हणून मराठे यांनी लेखी व बिनर्शत माफी मागावी, तसेच 1 कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अन्यथा त्यांच्या विरुद्ध दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसची प्रत राज्यपालांना देखील पाठविण्यात आली आहे.

Copy