कुर्‍हाकाकोडा बनावट मद्य कारखाना उद्ध्वस्त

कुर्‍हाकाकोडा येथे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अलीकडेच बनावट मद्याचा साठा जप्त केल्याची घटना ताजी असताना जळगाव गुन्हे शाखेने कुर्‍हे येथे धाड टाकून बनावट दारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला आहे. 37 हजारांच्या मुद्देमालासह एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून दुसरा संशयीत पसार झाला आहे. मंगळवार, 11 जानेवारी रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास कुर्‍हाकाकोडा येथे ही कारवाई करण्यात आली. अमोल एकनाथ वानखेडे व अमोल वसंत भोई (रा.कुर्‍हा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत अमोल भोई पसार झाला आहे तर अमोल वानखेडे यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाला कुर्‍हा येथे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर अमोल वानखेडे याच्या घरात छापा टाकला. संशयीताने घराच्या गच्चीवर बनावट दारूचा मिनी कारखाना सुरू केल्याचे प्रसंगी आढळून आले. संशयीत अमोल एकनाथ वानखेडे याने आपल्या घराच्या गच्चीवर हा कारखाना गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला होता तर या व्यवसायात त्याचा साथीदार अमोल वसंत भोई (रा.कुर्‍हा) हा देखील सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरवठादार व खरेदीदार पथकाच्या रडारवर
कुर्‍हा येथे सापडलेल्या बनावट मद्याच्या कारखान्यात रसायनासह स्पिरीटचा पुरवठादार नेमका कोण व बनावट मद्याची खरेदी करणारे खरेदीदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत असून त्या दृष्टीने पोलिसांनी खोलवर तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या बनावट दारू कारखान्याला कुणाचा राजकीय वरदहस्त तर नाही ना? ही बाबही समोर येणे गरजेचे आहे तर अनेक संशयीत या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक किरण धनगर, हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, रवींद्र पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, चालक हवालदार अशोक पाटील यांच्यासह कुर्‍हा दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माणिक निकम, संभाजी बिजागरे व कर्मचार्‍यांनी केली.

असा मुद्देमाल केला जप्त
पथकाने 20 हजार रुपये किंमतीची 30 लिटर विदेशी दारू, 640 रुपये किंमतीचे मॅकडॉल कंपनीचे बनावट लेबल्स व चार काचेच्या बाटल्या, 600 रुपये किंमतीच्या आयबी कंपनीचे बनावट लेबल, 260 रुपये किंमतीच्या 180 एम.एल.च्या 130 रीकाम्या बाटल्या, 200 रुपये किंमतीच्या मॅकडॉल कंपनीच्या शंभर रीकाम्या बाटल्या, 15 हजार रुपये किंमतीचे पंधराशे बुच, दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन मिळून 36 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगाव गुन्हे शाखेचे दीपक शांताराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार अमोल वानखेडे विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी करीत आहेत.