कुबेर समुहाच्या स्नेहसंमेलनाची तयारी

0

पुणे । फेसबुकसारख्या आभासी दुनियेत माणुसकीची नवी परिभाषा देणार्‍या ’कुबेर समुहाचे’ स्नेहसंमेलन 11 व 12 फेब्रुवारी रोजी ’मंत्रा रिसोर्ट, भोर,पुणे’ येथे आयोजित केले आहे. या संमेलनाची जोरदार तयारी सुरु असून संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. हिम्मतराव बाविस्कर, पत्रकार महेश म्हात्रे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता पुण्याचे कुबेर सदस्य परिश्रम घेत आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
या अनोख्या संमेलनात 11 फेब्रुवारी रोजी कविता वाचन, वेगवेगळ्या कुबेरकरांची व्याख्याने, सामाजिक विषयांवर प्रबोधन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोबतच नृत्य, नाट्य, एकपात्री प्रयोग, कथाकथन, रॅम्प वॉक, गीतगायन आदी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील मिळणार आहे. तर 12 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात शास्त्रीय संगीताची मैफिल रंगणार आहे. सोबतच कुबेर समूहाच्या वाटचालीची चित्रफित दाखविण्यात येणार आहे. यांनतर शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. हिम्मतराव बाविस्कर, पत्रकार महेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शन तसेच संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कुबेररत्नांचा केला जाणार सन्मान
कुबेर समूहाच्या निमित्ताने कुबेर रत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच समूहांतर्गत घेतलेल्या स्पर्धेतून विजयी प्रथम 5 कुबेरकवी व कुबेरलेखकांचा देखील सन्मान यावेळी केला जाणार आहे. यावेळी ठाणे संमेलनाच्या नियोजन समितीच्या सदस्यांचा देखील सत्कार केला जाणार आहे.