कुणावरही अन्याय न होवू देता ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रीया

0

नंदुरबार। महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्‍नांबाबत ग्रामविकास विभागाने आतापर्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले असून जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता येवून कुणावरही अन्याय न होवू देता बदली प्रक्रीया सुरळीत होणेकरीता यंदाच्या वर्षापासून राज्यात ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रीया करण्यात येणार असून नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर अन्याय न होवू देता लवकरच ग्रामविकास विभागाकडून शुद्धीपत्रक काढण्यात येणार असल्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पदवीधर शिक्षक महासंघाच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळास दिले.

निवेदनातील महत्वाचे मुद्दे
1) ग्रामविकास विभागाने 15/04/2014 च्या शासन आदेशात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांना पूर्णतः आदिवासी/नक्षलग्रस्त म्हणून घोषीत केलेले आहे. त्याच धरतीवर शुद्धीपत्रकात अक्कलकुवा, धडगांव तालुक्यांचा समावेश अवघड क्षेत्रात करण्यात यावा. 2) नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा या चार तालुक्यांची सलग सेवा व धडगाव, अक्कलकुवा या दोन तालुक्यांची सलग सेवा धरुन सेवाज्येष्ठता यादीत जाहीर करण्यात यावी. 3) धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील यापूर्वीच सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्या भागात देण्यात येवू नये. 4) धडगाव व अक्कलकुवा स्वेच्छेने जाणार्या प्राथमिक शिक्षकांना आपसी बदलीस मान्यता देण्यात यावी. 5) बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी सुट कायम ठेवून 53 वर्षांऐवजी 50 वर्षांवरील प्राथमिक शिक्षकांना, महिलांना बदलीत सुट देण्यात यावी. 6) दरवर्षी होणार्या शासन निर्णयातील बदलाऐवजी एकच शासन निर्णय कायमस्वरुपी निश्‍चित करण्यात यावा.

शिक्षकांवर अन्याय होणार नाही
नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही. तशी सकारात्मक चर्चा मंत्री पंकजा मुंडे, असिमकुमार गुप्ता यांनी शिष्ठमंडळाशी केलेली असून शासनस्तरावरुन लवकरच शुद्धीपत्रक काढण्यात येणार असल्याचे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. यावेळी शिष्ठमंडळात राज्य कार्याध्यक्ष पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष राकेश आव्हाड, जिल्हा मुख्य संघटक देवेंद्र बोरसे, जिल्हा संघटक रावसाहेब बावा, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संजय बागूल, पदवीधर शिक्षक महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष आबा बच्छाव, मनोज निकम आदी उपस्थित होते.