कुणाल आयकॉन सोसायटीमध्ये कचर्‍यापासुन खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

0

चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून प्रकल्प सुरू

महापालिकेचे आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांनी केले मार्गदर्शन

सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनमध्ये सोसायटीतील अंतर्गत ओला व सुका कचर्‍यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी प्रभाकर तावरे यांनी खत निर्मितीबद्दल माहिती दिली. यावेळी सोसायटीचे विनोद सुर्वे, चंद्रशेखर सोनपोठकर, मकरंद गुर्जर, प्रविण ढमाले, नटराज श्रीनिवासन, जॉन डिसुझा आदी सोसायटीतील रहिवासी, नागरिक, सहकारी उपस्थित होते.

एक टन कचरा संकलीत

या प्रकल्पाची माहिती देताना सोसायटीचे विनोद सुर्वे म्हणाले की, कुणाल आयकॉन सोसायटीतील मोठ्या प्रमाणात म्हणजे 1 टन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कचर्‍याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्रकल्पामधे संकलित करण्यात येतो. सुरूवातीला सोसायटीच्या एकाच विभागात हे काम सुरू करण्यात आले होते. ते आता सोसायटीच्या दोन भागात सुरू करण्यात आले आहे. एकुण एक टन ओल्या व सुक्या कचर्‍यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलिक झालेला कचरा प्रकल्पापर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कचर्‍याचे विलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडून करण्यात आला आहे.

मागणीनुसार विक्री करणार

यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपर्‍यात आणी आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. येथील कचर्‍यापासुन खत निर्मिती या उपक्रमाची आयआयटी संस्थेकडुनही भेट देवुन दखल घेण्यात आली आहे. तीन महिन्यात संकलिक कचर्‍याची पहिली खेप (बॅच) निघणार आहे. सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्यावतीने सांगण्यात आले.

Copy