कुठे गेली भाजपची पारदर्शकता

0

जळगाव – जिल्हा बँकेत नोटबंदीच्या काळात झालेल्या 73 लाखांच्या संशयास्पद व्यवहारांची सीबीआयने केलेली चौकशी राज्यात गाजत असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संशयास्पद व्यवहारात एका दिग्गज माणसाचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहरातील अजिंठा विश्रामगृहात पत्रकांरांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या सर्वच शाखाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. एकीकडे शेतकर्‍याच्या पीकविमा योजनेच्या पुनर्गठनासाठी आम्ही आंदोलने केली तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आता जिल्हा बँकेत मोठा अपहार झाल्याचे समोर आले आहे. राज्यात आणि देशात पारदर्शकता महत्वाची असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते; मग कुठे गेली भाजपची पारदर्शकता? अशी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील फडणवीस व केद्रातील मोदी सरकारवर केली आहे. अपहाराच्या सीबीआय चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तो दबाव कुणाचा?
अपहारात सीबीआयने जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेद्र देशमुख, चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर पाटील व रोखपाल रवीशंकर गुजराथी यांची चौकशी केल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असताना देखमुख यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन केले आहे. चोपडा शाखेचे व्यवस्थापक पाटील यांनी नोटा बदलण्यासंदर्भात दबाव होता असे सागितले आहे.

नोटा बदलामागे मोठा अधिकारी?
जिल्हा बँकेतून 73 लाखाच्या नोटा बदलण्यात आल्या आहे. यामागे मोठा अधिकारी असल्याचा अंदाज ना.पाटील यांनी व्यक्त केला आहे. माजीमंत्री नाथाभाऊनी देखील अपहाराबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. अपहाराच्या प्रकरणात तथ्य आहे म्हणून आ.खडसे यांनी प्रतिक्रिया दिल्या नसल्याचे ते म्हणाले. अपहाराचे प्रकरण मोठे असून नाशिक विभागाचे भालेराव तसेच जळगाव विभागाचे जिल्हा उपनिबंधक जाधवर यांच्याकडून अहवाल मागवून मी चौकशीचे आदेश देणार असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

सीबीआयला सहकार्य करणार
सीबीआयने आमच्या अमळनेर , चोपडा शाखेत अपहाराबाबत चौकशी केली आहे. आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करीत आहोत. जळगाव,चोपडा ,अमळनेर शाखेचे दफ्तर सीबीआयच्या अधिकार्‍यानी सोबत घेतेले आहे. ते चौकशी करीत आहे. मी नोटा बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकलेला नाही. या प्रकरणाशी माझा कुठला ही सबंध नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेद्र देशमुख यांनी दिली आहे.