कुठे गावांना पुराचा वेढा, कुठे दरड कोसळली, कुठे रास्ता-पूल वाहून गेला

मुंबई : गेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नद्या भरून वाहू लागल्या आहेत तर काही ठिकाणी साचलेलं पाणी घरांमध्येही शिरल्याचं दृश्य निर्माण झालं आहे.

रत्नागिरी, चिपळूणला पुराचा वेढा

रत्नागिरी – गेल्या २ दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातपूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागावर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सरकार कुठेही लोकांच्या मदतीसाठी कमी पडणार नाहीत. आवश्यक असेल ती सर्वोतोपरी मदत करून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. चिपळूण नगरपालिकेने २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अशा ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पुणेहून एनडीआरएफच्या दोन टीम खेडसाठी १ व चिपळूणसाठी १ येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कसारा गावात दरडीखाली सापडली सहा घरे

शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळल्याने मोट्या प्रमाणात नुकसान झाले, तर या दरडी मुळे ६ घरे दडपली असून घरातील लहान मोठे सर्व घराबाहेर पळाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे अधिकारी जयंता सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल आहे. मध्य महाराष्ट्राला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईला गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.