किसनराव-नजन पाटलांच्या गुन्हे शाखा निरीक्षकपदी बदलीला स्थगिती

पोलिस अधीक्षकांचा आदेश आयजींनी फिरवला ः पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निलंबनानंतर पाचोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी किसनराव नजन पाटील यांची एलसीबीच्या प्रभारी निरीक्षकपदी पोलिस अधीक्षकांनी गुरुवारी रात्री बदली केली होती तर किसनराव नजन-पाटलांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारताच कामालादेखील धडाक्यात सुरूवात केली मात्र हा आनंद औट घटकेचा ठरला. नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी.जी.शेखर-पाटील यांनी नजन-पाटलांच्या एलसीबी बदलीला स्थगिती दिली आहे. बकाले यांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील स्थिती पाहता एलसीबी निरीक्षकांबाबत यथावकाश नवीन अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येईल तो पर्यंत निरीक्षकपदाचा तात्पुरता पदभार जालिंदर पळे यांच्याकडे सोपवण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षकांचा आदेश आयजींनी फिरवला
पाचोरा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा तात्पुरता पदभार सोपवण्याबाबत पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी रात्री आदेश काढले होते. त्यात पाचोरा पोलिस ठाण्यासह एलसीबीचा प्रभारी पदभार असण्याचा उल्लेखही होता तर किसनराव नजन-पाटील यांनी शुक्रवारी दुपारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत येवून पदाची सूत्रेदेखील स्वीकारली मात्र काही तासातच आयजी बी.जी.शेखर यांनी पोलिस अधीक्षकांचा आदेश फिरवत या नियुक्तीला स्थगिती दिल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, आता एलसीबीची धुरा एपीआय जालिंदर पळे यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे.