Private Advt

किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक : भुसावळात शिवसेनेतर्फे निदर्शने

भुसावळात प्रांत कार्यायलाबाहेर जोरदार निदर्शने तर मुक्ताईनगरात रास्ता रोको व रावेरात तहसील प्रशासनाला निवेदन

भुसावळ : सन 2013 मध्ये आयएनएस विक्रांत ही भारताची युद्धनौका वाचविण्यासाठी तिचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहिम सुरू करून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला व आयएनएस विक्रांत ही देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने देशवासीयांनी भरभरून दान दिले शिवाय नेव्ही नगरात राहणार्‍या लष्करी अधिकार्‍यांनी पाच ते दहा हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी मदत केली होती मात्र सोमय्या यांनी जमा केलेली रक्कम राजभवन, दिल्लीत पोहोचलीच नाही त्यामुळे देशवासीयांच्या भावनेशी खेळून सोमय्या यांनी देशद्रोह केल्याने त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात टाकावे या प्रमुख मागणीसाठी भुसावळ शहरासह विभागात शिवसेनेतर्फे निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसंगी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भुसावळात प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
देशवासीयांकडून दान स्वरूपात जमा केलेल्या रकमेचे किरीट सोमय्या यांनी काय केले ? ही रक्कम भंगारात जाऊ पाहणार्‍या आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी राजभवनात जमा केली जाणार होती मात्र प्रत्यक्षात जमा केलेली रक्कम राजभवनात पोहोचलीच नसल्याची माहिती राज भवनातून मिळालेल्या पत्रान्वये स्पष्ट झाली आहे. किरीट सोमय्या यांनी देशातील व राज्यातील जनतेच्या भावनांशी खेळून एक प्रकारे देशाशी गद्दारी केल्याने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बराटे, उपतालुकाप्रमुख पप्पू बोरसे, युवा सेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, तालुका अधिकारी हेमंत बराटे, कैलास लोखंडे, दीपक धांडे, वरणगाव शहर प्रमुख निलेश ठाकूर, संतोष माळी, निलेश ठाकूर, पवन नाले, धनराज ठाकूर, कैलास जाधव, सुनील देव गाठोडे, अतुल पाटील, विलास वंजारी, पवन मेरा, मोहसीन खान, शहरी व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.