किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान

0

भुसावळ । तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गटात तर पंचायत समितीच्या सहा गणात निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर किरकोळ वाद वगळता मतप्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्हापरिषदेसाठी 14 तर पंचायत समितीसाठी 19 अशा एकूण 33 उमेदवारांचे भवितव्य गुरुवार 16 रोजी मतपेटीत बंद झाले. सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वत्र मतदान केंद्रांवर
निरुत्साह दिसून आला. मात्र चार वाजेपासून नागरिक घराबाहेर पडल्यामुळे केंद्रांवर रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 22.15 टक्के तर 3.30 वाजेपर्यंत 42.26 टक्के मतदान झाले होते.

कुर्‍हे पानाचे येथे तणाव

तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे भाजपाच्या उमेदवार पल्लवी सावकारे या मतदान केंद्रावर भेट देऊन परतत असतांना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याची शंका आल्याने त्यांनी वाहनाजवळ येऊन झडती घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी दोन्ही गट समोरा- समोर येऊन शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच कुर्‍हे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी भेट देऊन पाहणी केली. व अतिरीक्त बंदोबस्त मागवून कर्मचार्‍यांना सर्तकतेच्या सुचना केल्या.

मतदार याद्यांचा घोळ

मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जाताना नागरिकांनी केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या बुथवर आपल्या नावाची शोेधाशोध करावी लागली. यावेळच्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाण ावर त्रुट्या झाल्या असल्याचे दिसून आले. काहींचे नाव दुसर्‍याच वॉर्डात टाकण्यात आल्याचे दिसून आले तर काही मतदारांचे नाव या याद्यांमध्ये न सापडल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

मतदारांना वृक्षवाटप

निवडणुकीचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने कंडारी येथील वृक्षारोपण समितीतर्फे प्रथम मतदान करणार्‍या मतदारांना तुळशीचे रोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर इतर मतदारांना देखील 251 वृक्षांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समिती सदस्या स्मिता सुर्यवंशी, मनिषा महाजन, कोळी समाज जिल्हाध्यक्ष रुपाली सुर्यवंशी, माधुरी पाटील, सुरेखा वाघ, भारती लोखंडे, दुर्गादास सपकाळे, दुर्गाबाई पाटील, प्रमोद जगताप, संजय परदेशी, शेख जुम्मा, अनिता इंगळे, प्रताप वाघ आदी उपस्थित होते.

खिर्डी येथे 68 टक्के मतदान

रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द व खिर्डी बुद्रुक येथे एकूण सहा बूथवर सरासरी 68% मतदान झाले आहे. गावात मतदारांमध्ये सकाळी फारसा उत्साह बघायला मिळाला नाही. पण दुपानंतर मतदान केंद्रावर रांगा वाढल्या. शेवटी खिर्डी खुर्द येथे एकूण तीन बूथवर 2 हजार 803 मतदान पैकी 1 हजार 912 मतदान तर खिर्डी बुद्रुक येथे एकूण तीन बूथवर 3 हजार 69 पैकी 2 हजार 85 मतदान झाले आहे.

रावेर तालुक्यातील धुरखेडा येथे बहिष्कार मावळला

येथील सुमारे 225 मतदारांनी त्यांच्या पुनर्वसन प्रश्नी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकला. कोणत्याही अधिकार्‍यांकडून आश्वासन त्यांना मिळाले नाही अखेर दुपारी तीन नंतर या मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या.

फैजपूर, दहिगाव येथे गुलाबपुष्प देवून स्वागत

आज सकाळपासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदान संथगतीने सुरु होते.दुपारनंतर मात्र सर्वत्र रांगा दिसून आल्या. फैजपूर ग्रामीण व दहिगाव येथील आदर्श मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी आलेल्या मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या मतदान केंद्राबाहेर सडे टाकून रांगोळी काढण्यात आली होती. निवडणूक निरीक्षक दिलीप स्वामी यांनी तालुक्यात काही मतदान केंद्रांवर भेटी देत पाहणी केली. मतदानासाठी 160 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पाच कर्मचारी नियुक्त होते. विशेष म्हणजे निवडणूकीसाठी सर्व नियुक्त कर्मचार्‍यांना आजच केंद्रावर रोख स्वरूपात मानधन वितरीत करण्यात आले. साकळी – दहिगाव गटात मतदारांचा उत्साह सकाळपासून टिकून होता.

न्हावीला 60 टक्के मतदान

येथे सकाळी सुरवातील मसाकाचे चेअरमन शरद महाजन यानी मतदान केले. पहील्या टप्यात दुपारी 12 ते 1 वाजेपर्यत निरुत्साह जाणवला. दुपारी 4 वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले होते. नंतर रांगा दिसुन आल्या. मतदार याद्यांमध्ये बराच घोळ झाल्याने नावे शोधण्यासाठी मतदारांची धावपळ झाली. ग्रामसेवकांनी घरोघरी मतदान पत्रिका दिल्या नाही म्हणून हा घोळ झाल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 9 हजार 706 पैकी 5 हजार 876 (60.41 टक्के) मतदान शांततेत पार पडले. मारुळ येथे 7 हजार 500 पैकी 4 हजार 068 मतदान झाले. फैजपुरचे एपीआय सार्थक नेहते तसेच गावाचे पोलिस पाटील संजय चौधरी यानी बंदोबस्त ठेवला.

मुक्ताईनगर तालुक्यात दुपारनंतर वाढली गर्दी

तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या आठ गणांच्या निवडणुकीत आज सकाळ पासून संत गतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रीयेला मतदारांनी दुपारी 4 नंतर मतदानासाठी वेग धरला. सकाळपासून शुकशुकाट असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची विक्रमी गर्दी झाली होती व तालुक्यात तीन ठिकाणी मतदान केंद्रावर बॅलट मशीनचे बटन दबत नसल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती. तर अंतुर्ली येथे किरकोळ वाद वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत निवडणुक प्रक्रिया पार पडली.

आमदार खडसेंनी बजावला मतदानाचा हक्क

कोथळीत सकाळी 11 वाजता मतदान केंद्रावर माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्नी मंदा खडसे व मुलगी अ‍ॅड. रोहीणी खडसे यांच्यासह मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी 2 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ही जिल्हा परिषद मराठी शाळा नं.1 मध्ये मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला. तसेच बेटी पढाओ बेटी बचाओ चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी आपल्या वढोदा गावी मतदानाचा हक्क बजावला.

लग्नाआधी मतदानाला प्राधान्य

रावेर तालुक्यात पंचायत समितीच्या बारा तर जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. दुपारनंतर केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. 3.30 वाजेपर्यंत 41.17 टक्के मतदान झाले होते. तालुक्यातील वाघोड येथील पंकज महाजन यांचे आज लग्न होते. त्यांनी मतदान या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देवून घोड्यावर बसून थेट मतदान केंद्र गाठले आणि आपले मतदानाचे कर्तव्य बजावले