किन्ही आरोग्य केंद्रासह विविध विभागांचा रुग्ण कल्याण समिती अध्यक्षांकडून आढावा

0

भुसावळ : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात संपूर्ण आरोग्य विभागाची व बाल विकास विभाग शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभागाची आढावा बैठक जिल्हा परीषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रसंगी औषध साठा तसेच रुग्ण तपासणी आढावा घेण्यात आला. दीपनगर येथे औष्णिक विद्युत केंद्र येथील महाजनकोचे 525 लेबर, साकेगाव येथील 166 रुग्ण, लोणारी हॉल येथील 57 नागरीक अशा विविध ठिकाणी रुग्ण तपासणी सुरू असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे यांनी सागितले.

विविध विभागांचा घेतला आढावा
ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेतांना आपल्या तालुक्यातील संपूर्ण निर्जंतुकीकरण फवारणी झाली व पुन्हा येणार्‍या आठवड्यात करण्यास आपण आदेश करत आहोत व प्रत्येक गावात वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे असे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी सांगितले. तालुक्यातील पोषण आहार धान्यसाठा शिल्लक असलेला 90 शाळेतील विद्यार्थी यांना वाटप करण्यात आले, असे गटशिक्षण अधिकारी तुषार प्रधान यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व अंगणवाडी बालकांना पोषण आहार धान्य वाटप केले आहे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी आर.के.गायकवाड यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे, गट शिक्षणाधिकारी टी.डी.प्रधान, किन्ही सरपंच हर्षा येवले, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी आर.के.गायकवाड, डॉ.कल्पना दवंगे, उपसरपंच प्रदीप कोळी, कैलास येवले, जी.आर.चौधरी आदी उपस्थित होते.

Copy