Private Advt

किनगावातील 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

प्रेम भंगातून उचलले टोकाचे पाऊल : भिंतीवरही केला उल्लेख

यावल : तालुक्यातील किनगाव येथे 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. समाधान राजू महाजन (27) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तरुणाने भिंतीवर केल्याचे सांगण्यात आले.

घरी एकटा असताना उचलले पाऊल
किनगाव बुद्रूक येथील जिल्हा परीषद शाळेजवळ राजू महाजन कुटुंबासह राहतात. बुधवारी ते व पत्नी, लहान मुलगा, सून (लहान मुलाची पत्नी) असे सर्व जण शेतात कामाला गेले होते. त्यांचा अविवाहित मोठा मुलगा समाधान राजू महाजन (27) हा घरी एकटा होता. महाजन कुटुंबीय सायंकाळी साडेपाच वाजेला शेतातून घरी परतले. यावेळी समाधान हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार पाहून कुटुंबीय प्रचंड हादरले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी समाधान याने भिंतीवर प्रेमभंग झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले आढळून आले. योगेश महाजन यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार अजिज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करत आहे. शवविच्छेदनानंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता किनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.