किनगावच्या तरुणाची कौटुंबिक वादातून आत्महत्या

घटस्फोटासाठी मागितले 25 लाख व कोर्ट केसला कंटाळून मुलाची आत्महत्या : कुटुंबियांचा आरोप

यावल : कौटुंबिक कलह झाल्यानंतर तालुक्यातील किनगाव येथून रविवारी 32 वर्षीय विवाहित तरुण बेपत्ता झाला व मंगळवारी या तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. आपल्या मुलाला आत्महत्येस भाग पाडण्यात आले असून घटस्फोट देण्यासाठी 25 लाखांची मागणी करण्यात आली तसेच काही संघटनांनी दादागिरीची भाषा वापरल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप मयत कुटुंबियांनी केला असून पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करून पुढील कायदेशी कारवाई होईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिले आहे. तुषार गोपाळ राणे (32) असे मयत युवकाचे नाव आहे.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रविवारी मध्यरात्रीपासून तुषार राणे हा तरुण बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी रत्ना तुषार राणे यांच्यात वाद असल्याने ते विभक्त राहत होते व या कौटुंबीक वादामुळे नैराश्यापोटी तो घरातून निघुन गेल्याची तक्रार आशाबाई गोपाळ राणे (68) या वृध्द महिलेने केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी गावालगत असलेल्या जितेंद्र राणे यांच्या शेत विहिरीत तुषार राणे याचा मृतदेह आढळुन आल्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. या प्रकारणी बाळू गोपाळ राणे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.

घटस्फोसाठी 25 लाखांची मागणी : राणे कुटुंबियांचा आरोप
गेल्या सहा महिन्यांपासुन सून व तिचे कुटुंबीय तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी किनगावात वारंवार येवून दमदाटी करायचे, कोर्टात विविध ठिकाणी केसेस केल्या आहेत, घटस्फोटासाठी 25 लाखांची मागणी करण्यात आली तसेच पैसे लवकर उपलब्ध करावे म्हणून नेहमीच विविध संघटनेच्या तरुणांना सोबत घेवून सुन रत्ना ही मुलास व आम्हास त्रास द्यायची व याचं जाचास कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप मयत तरुणाची आई अशाबाई राणे यांनी केला.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
जळगावातील विविध संघटनेच्या तरुणांना सोबत घेवून किनगावात येवुन घरासमोर अनेक वेळा भावाची पत्नी रत्ना हिने वाद-विवाद केले याचे सीसीटीव्ही फुटेज या भागातील दुकानात मिळतील, अनेक खोट्या केसेस केल्या, आम्ही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला पण 25 लाख द्या अशी मागणी करीत ती सतत दम द्यायची व मागे आपल्या भाचीला देखील तिने त्रास दिला होता, असा आरोप मयताचा भाऊ बाळू राणे यांनी केला.

चौकशी करून निर्णय : पोलिस निरीक्षक
या घटनेत आधी हरवल्याची तक्रार व नंतर मृतदेह मिळून आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दोन्ही तक्रारीत कौटुंबीक वादाचे कारण नमुद असून या प्रकरणी सखोल चौकशी करून पुढील कायदेशी कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले.

Copy