का रे दुरावा, का रे अबोला…

0

शिमग्याला अजून एक दिवस बाकी आहे. पण त्या आधीच गेल्या पाच दिवसांपासून विधीमंडळ अधिवेशनात विरोधक सरकारच्या नावाने बोंब ठोकत आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी ही बोंब आहे. या सरकारचं करायचं काय, खाली डोक वर पाय… फडणवीस सरकार हाय हाय. विधानसभेच्या पायरीवर विरोधकांनी हा शिमगा घातला होता. वरच्या सभागृहातही विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या गोंधळामुळे सुरुवातीला एक तास आणि त्यानंतर दिवसभरासाठी विधान परिषद तहकूब करावी लागली. पाचव्या दिवशी महत्त्वाची ठरली ती कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती. स्वाभिमान संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कांदा फेको आणि तूर फेको आंदोलन केल्यानंतर शेट्टी आणि सदाभाऊमधील दुराव्याची चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यातील दुरावा वाढल्याची बातम्या राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या होत्या. ज्यावेळी विधानभवनाबाहेर राजू शेट्टींचे आंदोलन झाले त्यावेळी सदाभाऊची अनुपस्थितीही चर्चिली गेली. पण आमच्या दोघांमधील कोणताच विसंवाद नाही हे सांगायला सदाभाऊ खोत विसरले नाही. शुक्रवारी विधान परिषदेत सदाभाऊंची एन्ट्री झाली. सदाभाऊ, सुनील तटकरेंच्या बाकाजवळ आले. त्यावेळी तटकरे यांनी सदाभाऊंशी हस्तांदोलन करीत, का रे दुरावा .. का रे अबोला..बाजूला सारत शेतकर्‍यांना कर्जमाफी करावी असे वक्तव्य केले.

काही वेळातच सभापतींचे आगमन झाले त्यावेळी अनेक सदस्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. सभागृह सुरू झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी केली. का रे अबोला का रे दुरावा त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर होऊ नये, असे तटकरे म्हणाले. आमच्या दोघांमध्ये कोणताच विसंवाद नाही, अशी प्रतिक्रिया देणारे सदाभाऊ मात्र तटकरेंच्या या वक्तव्यावर काहीच बोलेले नाही. त्यामुळे हा दुरावा आणि अबोला, सदाभाऊंनी एकप्रकारे मान्यच केल्याचे दर्शन घडले.

– संतोष गायकवाड
9821671737