कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या

0
कॅन्डल मार्च काढून नागरिकांची मागणी
पिंपरी : हिंजवडीतील कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली. घटनेतील आरोपींना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ज्ञ सरकारी वकिलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. याचबरोबर पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर अर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. हिंजवडी, कासारसाई येथील दुर्दैवी घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधी पिंपरी-चिंचवड कृती समितीच्यावतीने पिंपरीत कॅन्डल मार्च व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून गुरुवारी सायंकाळी गोकूळ हॉटेल, शगुन चौक, कराची चौक, रिव्हर रोड, झुलेलाल मंदिर येथील पवना घाट येथे कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी घाटावर या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली सभेत नगरसेविका योगिता नागरगोजे, केशव घोळवे, दीपक नागरगोजे, सारिका चव्हाण, नीता परदेशी तसेच पिंपरी-चिंचवड मधील विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी साखर कारखाना परिसरात कायमस्वरूपी साखर शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ जाहीर करावे. या महामंडळांतर्गत मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.
Copy