काश्मीर कनेक्ट : सर्वात मोठा बोगदा राष्ट्रार्पण!

0

श्रीनगर : अत्याधुनिक सुविधांनी पूर्ण आणि देशातील सर्वात मोठा ठरलेल्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रविवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर लोकार्पण करण्यात आले. चेनानी-नाशरी असे या बोगद्याचे नाव आहे. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी खुल्या जीपमधून या बोगद्याचे निरीक्षण करत अभियंत्यांचे कौतुक केले. जम्मूहून काश्मीर खोर्‍यात जाणार्‍या वाहनांना या बोगद्याद्वारे प्रवास स्वस्तात पडेल. चेनानी ते नाशरी यादरम्यानचे तब्बल 41 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे. यापूर्वी डोंगराळ रस्ते आणि धोक्याचे वळण मार्ग यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला होता. महिन्याकाठी 30 लाख रुपयांची इंधन बचत होईल, अशी माहिती रस्ते विकास विभागाच्यावतीने देण्यात आली. लोकार्पणप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दहशतवादी हल्ल्यापासून पूर्ण सुरक्षित
हा असा एक बोगदा आहे, ज्याच्या आत आणि बाहेर 124 सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. प्रत्येक 75 मीटर अंतरावर एक कॅमेरा असून, ते 360 अंशाच्या कोनात फिरू शकतात. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यापासून हा बोगदा पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला आहे. बोगद्यात हवा खेळती राहील, अशी व्यवस्थाही असून, सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. विपरित भौगोलिक परिस्थितीत 9.20 किलामीटर लांबीच्या या बोगद्याचे निर्माण करण्यात आले आहे. आरएफ अ‍ॅण्ड एफएस ट्रान्सपोर्ट नेटवर्क लिमीटेड या कंपनीने या बोगद्याचे काम केले असून, त्यासाठी साडेचार वर्षाचा कालावधी लागला आहे. हा बोगदा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर चेनानी येथे सुरु होतो तर नाशरी गावाजवळ संपतो. बोगदा बनविण्यासाठी केंद्र सरकारला 3720 कोटींचा खर्च आलेला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर जोडले गेले आहेत.